MNS activist killed in Mumbai : १३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील मालाड येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. रिक्षावाल्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाची भररस्त्यात हत्या केली. आकाश माईन असे त्याचे नाव असून, तो मनसेचा कार्यकर्ता होता. मुंबईतील मालाड पूर्व भागात रविवारी ही घटना घडली. अंगावर काटा आणणारी ही घटना वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मृत आकाश माईन यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली. आकाश हा मनसे पदाधिकारी दीपाली माईन यांचा मुलगा होता.
दरम्यान, रिक्षावाले आणि फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश माईन याला रात्री ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, त्याचा पाय, हात, पोट आणि कंबरेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. २८ वर्षीय आकाश दत्तात्रय माईन हा स्कूटरवरून पत्नीसोबत कार खरेदी करण्यासाठी गेला होता. मालाड रेल्वे स्टेशनजवळ एका रिक्षाचालकाने अचानक कट मारला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. बघता बघता वाद वाढला. रिक्षाचालकाने त्यांच्या इतर रिक्षाचालक मित्रांना आणि आजूबाजूच्या फेरीवाल्यांना बोलावून घेतले. त्यानंतर आकाश माईन याला त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तिथे आकाशचे आई वडीलही आले. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी आकाशची पत्नी अनुश्री माईन हिच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलीस ठाण्यात रविवारी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काही पथक तयार करून आरोपींचा शोध घेतला. आकाश माईन याला मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ९ आरोपींना अटक केली. त्यापैकी ६ जणांची ओळख पटली असून, अविनाश नामदेव कदम, अमित जोगिंदर विश्वकर्मा, आदित्य दिनेश सिंह, जयप्रकाश दीपक आमटे, राकेश ढवळे आणि साहिल कदम अशी त्यांची नावे आहेत. अविनाश कदम याच्यावर जखमी केल्याप्रकरणी आणि एक अपघाताचा गुन्हा पंतनगर आणि बोरिवली ठाण्यात दाखल आहे.