मुंबई - मागील आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेने एकत्र लढावे, या संदर्भातही राज व सोनिया गांधी यांची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नव्या समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडी लक्षात घेत, आघाडीच्या अपेक्षेने मनसेतील इच्छुक सुद्धा आता कामाला लागले आहेत. तर मनसेमधील नेत्यांनी आपल्या मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी सुद्धा सुरु केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या प्रयत्नांना काँग्रेसने विरोध केला होता. मात्र आता राज ठाकरे हे थेट सोनिया गांधींच्याच भेटीला गेल्याने मनसेला महाराष्ट्रातील महाआघाडीत सामावून घेण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होण्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. मनसेला आघाडीत घेण्याची खात्री असल्याने आता मनसेमधील इच्छुक सुद्धा कामाला लागले आहेत. पक्षातील इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढणे सुरु केले आहेत. मतदार संघातील मतांची आकडेवारी,जातीय समीकरण याचा आढावा घेणे सुरु केले आहे. तर जागावाटपच्यावेळी आपला मतदारसंघ मनसेलाच सुटणार असे दावे सुद्धा अनेकांनी सुरु केले आहे.
लोकसभा निवडणुकीत राज यांच्या सभेमुळे मोदींच्या विरोधात एक वातावरण निर्माण झाले होते . त्यांच्या सभेला मोठी गर्दी सुद्धा पहायला मिळायची. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज यांच्या आक्रमकतेचा फायदा आघाडीला होऊ शकतो हे लक्षात घेत, त्यांना महाआघाडीत घेण्याची मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांकडून होत आहे.
विजय चव्हाण ( मनसे जिल्हाध्यक्ष औरंगाबाद )
विधानसभा निवडणुकीत मनसे आघाडीत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मनसेमधील इच्छुकांनी भेटीगाठी सूर केल्या आहेत. स्वताः राज ठाकरे यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही काम सुरु केले आहेत. आघाडीत गेलो तर आम्हाला काही जागा मिळतीलच आणि नाही गेलो तरीही निवडणूक लढणार अहोतोच, असे औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष विजय चव्हाण लोकमतशी बोलताना म्हणाले.