ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजला असतानाच उद्धव व राज ठाकरे यांचे दुर्मिळ फोटो मनसेच्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड करण्यात आल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हे फोटो अपलोड करुन मनोमिलनाचे संकेत दिले जात आहेत की काय अशी चर्चाही रंगू लागली आहे.
मंगळवारी मनसे अधिकृत या फेसबूक व ट्विटर अकाऊंटवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे व जयदेव ठाकरे या तिघांचे काही दुर्मिळ फोटो अपलोड करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ट्विटरवर या फोटोंमध्ये आदित्य ठाकरेंनाही टॅग करण्यात आल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला असून मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे भाजपा - शिवसेनेच्या संसारातही धुसफूस सुरुच आहे.आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना - भाजपा स्वबळावर लढण्याची दाट शक्यता आहे. तर मनसेची अवस्थाही फारशी चांगली नाही. उद्धव - राज कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकत्र येणार अशी चर्चा आधीपासूनच रंगली होती. या पार्श्वभूमीवर मनसेच्या पेजवर उद्धव - राज यांचे दुर्मिळ फोटो टाकण्यात आल्याने चर्चेला बळ मिळाले आहे. फोटोंच्या टायमिंगचा 'राज' काय यावर सोशल मिडीयावर चर्चाही रंगू लागल्या आहेत.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या फोटोविषयी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. नांदगावकर म्हणाले, राज, उद्धव आणि जयदेव ठाकरे हे तिघेही भाऊ आहेत. त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. पण राज आणि उद्धव ठाकरे कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी एकत्र आले तर यापेक्षा चांगले काहीच नाही असे त्यांनी सांगितले.