लोकसभेला एकत्र आलेले पक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उमेदवार उभे करू लागले आहेत. काँग्रेसला जागा हवी असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केला आहे. तर भाजपाच्या जागेवर काही दिवसांपूर्वीच मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देणाऱ्या व त्यांच्यासोबत सभा घेणाऱ्या राज ठाकरेंनी उमेदवार जाहीर केला आहे. आता भाजपा निरंजन डावखरेंनामनसेविरोधात लढविणार का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाचा मनसेचे उमेदवार अभिजित पानसेंनी मनसेची भुमिका स्पष्ट केली आहे.
निरंजन डावखरे हे गेली दोन टर्मचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळी डावखरेंना उमेदवारी मिळणार का यावरून काही महिन्यांपूर्वी चर्चा सुरु होती. अशातच मनसेने उमेदवार दिल्याने भाजपासमोर पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. याला भाजपा पाठिंबा देईल का अशीही चर्चा रंगली आहे.
अशातच पानसे यांनी राज ठाकरेंनी पंतप्रधान पदासाठी मोदींना पाठिंबा दिला होता. आम्ही महायुतीचा घटकपक्ष नव्हतो. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. येणारी प्रत्येक निवडणूक मनसे लढविणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मी गेले काही महिने या निवडणुकीसाठी काम करत होतो. नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नोंदणी प्रक्रिया केली आहे. पदवीधरांच्या आमदाराने पदवीधरांसाठी काम केले पाहिज. मला कोणाचा इतिहास काढायचा नाही, परंतु आमदार म्हणून काय केले, मी गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे, अशा शब्दांत पानसे यांनी टीका केली.
आमच्याकडे नोंदणी आहे, कार्यकर्ते आहेत. आम्हाला कोणाचा पाठिंबा मिळो, न मिळो आम्ही विजयासाठी लढत आहोत. पाठिंब्याचे त्यांना विचारा, माझ्या पातळीवर तरी ते काही शक्य नाही, असे पानसे यांनी टीव्ही९ शी बोलताना स्पष्ट केले आहे.