मुंबई : सत्ताधारी असो वा विरोधक या दोघांनीही उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच ‘डिड यू नो’, ‘यू शुड नो’ असे म्हणत प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे आता या प्रचाराच्या स्पर्धेत अटीतटीच्या स्पर्धेकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ‘ब्ल्यू प्रिंट’ पुन्हा डोक वर काढणार आहे. आगामी निवडणुकांच्या धर्तीवर या ब्ल्यू प्रिंटमधील शहरविकासाबाबतच्या संकल्पना वेगळ््या काढून त्यांचा प्रचाराकरिता वापर करण्यात येणार आहे.मनसेच्या ‘ब्ल्यू प्रिंट’मधील शहरविकासाच्या संकल्पनेत मुख्यत: लोकसंख्येवर आधारित शहररचना करण्यात येईल. भविष्यात विकसित करणाऱ्यात येणाऱ्या शहरातील दळणवळण, वीज, पाणी , रस्ते, मोकळ््या जागा, मल:निसारण, घनकचरा व्यवस्थापन, इंटनरेट सेवा उपलब्धता, जैवविविधता आणि पर्यावरणाचा प्रामुख्याने विचार केला जाईल. तसेच, बहुउद्देशीय प्रकल्पांची उभारणी, पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण, झोपडपट्टी पुनर्वसन, प्रत्येक ठिकाणी आंतरराष्ट्रीय मराठी शाळा शहरविकासांतील या मुद्द्यांवर प्रचारादरम्यान भर दिला जाणार आहे. याशिवाय, शहराची अर्थव्यवस्था, नगरनियोजन, आरोग्य, शिक्षण, वाहतूक या मुद्द्यांचा समावेश ‘ब्ल्यू प्रिंट’मधील शहरविकासात करण्यात आला आहे.‘ब्ल्यू प्रिंट’मधील शहरविकासाच्या या मुद्द्यांवर आधारित व्यंगचित्र आणि चित्रे साकारण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय घरोघरी प्रचार करण्यासह सोशल मीडियामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी विविध हटके संकल्पनांचा अवलंब करण्यात येणार असून त्याप्रमाणे तयारी सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ब्ल्यू प्रिंटच्या या प्रचारासाठी व्हॉट्सअॅपवर ग्रूप्स बनवून तरुण मतदारांना ‘लक्ष्य’ केले जाणार आहे. शिवाय, मनसेच्या मुख्य ‘सोशल वॉर’ रुम प्रमाणे तरुण कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन स्थानिक पातळीवर वॉररुम सुरु करण्यात आले आहेत. जेणेकरुन, स्थानिक पातळीवर तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ही शक्कल लढविण्यात येईल. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मनसेची बहुचर्चित ‘ब्ल्यू प्रिंट’ चर्चेचा मुद्दा बनेल. (प्रतिनिधी)
मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट’ पुन्हा डोकं वर काढणार
By admin | Published: January 28, 2017 3:13 AM