ठाणे - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्रीय झाले आहेत. आज ठाणे जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंनी बैठक घेतली. ठाण्यात शिंदे गट, शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शिंदे गटात प्रवेश करणारे हे मनसेचे पदाधिकारी नव्हते. ३ महिन्यापूर्वी ज्यांना काम करत नव्हते म्हणून काढले होते त्यांना प्रवेश दिला गेला असा टोला मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लगावला.
अविनाश जाधव म्हणाले की, सध्या शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचं पाहिले तर ज्यांना पदावरून काढले होते त्याने आमचं नुकसान काहीच नाही. शिंदे गटाला माणसं हवीत. ठाणे शहर काही परिसर सोडला तर फारसं अस्तित्व शिंदे गटाचं नाही. ज्याला ३ महिन्यापूर्वी पदावरून काढलं. त्याला शिंदे गटात प्रवेश दिला. हजारो लोक आमच्याकडे येतात तसे काही जातातही. ९ वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून जो परिणामकारक निकाल देत नसेल तो त्यांच्याकडे गेला तरी काय अपेक्षा करणार आहे? असा टोला जाधव यांनी लगावला.
तसेच गेलेला एकही पदाधिकारी आमच्या पक्षाच्या पदावर नव्हते. काहींच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. राज ठाकरेंनी ज्याला ९ वर्ष संधी दिली. जिल्हाध्यक्ष म्हणून कामाची छाप पाडू शकले नाहीत. त्यांना ओवाळून टाकलं त्यांना प्रवेश दिला आहे. त्यांना ओवाळून टाकलेली माणसं हवी असती तर घ्यावीत असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच यंदाच्या दहिहंडीला सरकारने निर्बंध मुक्त केले आहे. त्यामुळे गोविंदांच्या उत्साहाला आनंद आहे. या मुलांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद आहे. आम्हीदेखील मनसेकडून मोठी दहिहंडी आयोजित करणार आहोत अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
नेमकं काय घडलं?शिवसेनेपाठोपाठ आता मनसेलाही शिंदे गटाने खिंडार पाडलं आहे. पनवेल, उरण आणि खारघर भागात अंतर्गत वादातून मनसेचे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. मागील ८ वर्षापासून ते जिल्हा अध्यक्षपदावर कार्यरत होते. मनसेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांसह एकूण ६५ जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. मनसेमधली अंतर्गत धुसफूस यासाठी कारणीभूत असल्याचं समोर आले आहे.