पनवेल – मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मनसेकडूनकोकण जागरयात्रा काढण्यात येत आहे. मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरेंच्या नेतृत्वात ही पदयात्रा विविध टप्प्यात काढण्यात येणार आहे. सकाळी साडेपाच वाजता अमित ठाकरे नवी मुंबईत पोहचले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात अमित ठाकरेंचे स्वागत केले. त्यानंतर अमित ठाकरेंनी पनवेल येथे महादेवाचं दर्शन घेतले आणि तिथून पुढे मनसेच्या कोकण जागरयात्रेला सुरुवात झाली.
यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, १७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना देशद्रोही म्हणणार असाल तर ह्या खराब रस्त्यामुळे अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना काय म्हणायचं? मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय..पण तरीही काही सुधारणा होणार नसेल पुढचं आंदोलनात अधिक तीव्र, आक्रमक महाराष्ट्र सैनिक आणि कोकणी माणूस तुम्हाला अनुभवायला मिळेल असा इशारा त्यांनी दिला.
अमित ठाकरेंच्या नेतृत्वात आज पळस्पे फाटा ते खारपाडा अशी १६ किमीची पदयात्रा काढण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे कोकणी माणूस संतापाने खदखद व्यक्त करत आहे. या संतापाला वाट करून देण्यासाठी आणि सरकारचा निषेध करण्यासाठी ही पदयात्रा मनसे नेत्यांच्या नेतृत्वात रायगड आणि रत्नागिरी या २ जिल्हायात ८ वेगवेगळ्या मार्गांवरून काढली जात आहे. या कोकण जागरयात्रेचा समारोप कोलाड आंबेवाडी नाका येथे होणार आहे. समारोपावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कोकण जागरयात्रेची माहिती देताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर आरोप केले. त्याचसोबत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या टीकेवरही प्रत्युत्तर दिले. बाळा नांदगावकर म्हणाले की, १७ वर्ष रखडलेल्या मुंबई -गोवा महामार्गाकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष सुरु आहे. या महामार्गाची दुरावस्था सगळे पाहतायेत. सरकारने आता तरी मनावर घेऊन हा रस्ता दिलेल्या वेळेत पूर्ण करावा नाहीतर यंदाच्या निवडणुकीत कोकणी माणूस चांगला इंगा दाखवेल असं त्यांनी म्हटलं. बाळा नांदगावकर यांनीही तरणखोप येथून या पदयात्रेला सुरुवात केली आहे.