मुंबई : भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेकडून राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर काल राज्यातील अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले आहे. यावरून सध्या शिवसेना आणि मनसे यांच्यातील कलगितुऱ्यामुळे राज्यातील राजकारण प्रचंड ढवळून निघत आहे. दोन्ही पक्षांत कोण सर्वाधिक प्रखर हिंदुत्ववादी? हे सांगण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसत आहेत. यातच आता काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे, असे म्हणत मनसे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे.
"मनसेचे अज्ञान किती? हे स्पष्ट दिसते. मुंबई पोलीस अॅक्ट ३८(१) अन्वये मुंबईत पोलीस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात. यात किती व केवढा वेळ वापरण्याचा नियम नाही. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवले. याव्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले वा रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणी वापर केला तर तक्रार करता येते. पहाटेची अजान स्वतः मुस्लिम समाजाने बंद केली आहे. पण आता काकड आरतीही बंद झाली. वस्तुस्थिती ही की मनसेमुळे हिंदूचे अधिक नुकसान झाले आहे", असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, मुंबईत एकूण २४०४ मंदिरे व ११४४ मस्जिद आहेत.कालपर्यंत केवळ २० मंदिराकडे परवानगी आहे. तर ९२२ मस्जिदींकडे परवानगी आहे. ५ मंदिरांचे व १५ मस्जिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. मनसेचे ऐकलं तर २४०० मंदिरांनाही तसेच चर्च, गुरुद्वारा,बौद्ध मंदिरांना भोंगे वापरता येणार नाहीत. सार्वजनिक उत्सवांना परवानगी मिळणार नाही, असे ट्विटद्वारे सचिन सावंत यांनी सांगितले.
पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेला निकराचा विरोध केला आहे. महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली. हे पाप कोणाचे? मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक आहे. भाजपाशासित राज्यांनी बंदी का घातली नाही? याचे कारण स्पष्ट आहे, असे म्हणत सचिन सावंत यांनी मनसे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.