मुंबई : मुंबई शहराचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या राजे संभाजी विद्यालयाची सुरक्षा वा-यावर असल्याचा आरोप मनविसेतर्फे करण्यात आला आहे. या शाळेला सुरक्षारक्षक नाही. तसेच शाळेच्या आवारातच शिवसेनेचे बॅनर असून, संपर्क कार्यालयही थाटल्याची माहिती मनविसेने उघड केली आहे.सांताक्रुझ येथे राजे संभाजी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक मराठी माध्यमाची शाळा भरते. या शाळेच्या मुख्याध्यापकपदी महापौर विश्वनाथ महाडेश्वर होते. जुलैमध्ये त्यांनी मुख्याध्यापकपदाचा राजीनामा दिला. पण, अजूनही शाळेत मुख्याध्यापक कक्षावर असलेल्या पाटीवर विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव असून, या कक्षाला कुलूप लावल्याची माहिती मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी दिली.चित्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मनविसेचे काही पदाधिकारी हे राजे संभाजी विद्यालयात गेले होते. त्या वेळी शाळेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नव्हता. शाळेत कुठेही सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा वाºयावरच असल्याचे दिसून आले. या शाळेच्या आवारात शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय थाटण्यात आले. शाळेच्या वर्गांबाहेर शिवसेनेचे बॅनर लावण्यात आले आहेत.या सर्व प्रकारानंतर मनविसेच्या पदाधिकाºयांनी महापौरांची भेट घेतली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात सोमवारी साडेचार वाजता मनविसेच्या पदाधिकाºयांनी भेट घेतली. या वेळी शाळेत सुरक्षेच्या उपाययोजना आखाव्यात अशी प्रमुख मागणी केली आहे. तसेच, शालेय विद्यार्थ्यांवर कोणत्याही संघटनेचे संस्कार होऊ नयेत. शाळेत संपर्क कार्यालय असू नये अशा मागण्या केल्याचे चित्रे यांनी सांगितले.यासंदर्भात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ‘सर कार्यक्रमात असल्याचे त्यांच्या पीएने सांगितले आणि आता बोलता येणार नाही असे स्पष्ट केले. महापौर महाडेश्वर यांना मेसेजही केला होता. पण, या विषयावर त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही.
महापौरांच्या शाळेची सुरक्षा वा-यावर, मनविसेने धक्कादायक माहिती केली उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 5:33 AM