- आप्पासाहेब पाटील
सोलापूर, दि. २४ : महावितरणच्या अॅपद्वारे वीजग्राहकांना २४ तासांत वीजजोडणी देण्याच्या योजनेला राज्यात मोठी गती मिळत असून सोलापूर जिल्ह्यात ३२ वीजग्राहकांना अवघ्या २४ तासांत वीजजोडणी देण्यात आली. राज्यात इतर ठिकाणी अशाच प्रकारे वीजजोडणी देण्यात येत आहे.
वीजग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असलेल्या महावितरणने सोलापूर जिल्ह्यात ग्राहकसेवेचा नवा मानदंड निर्माण केला. नवीन वीजजोडणीसाठी अर्ज केलेल्या ३२ ग्राहकांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पूर्ण करून केवळ २४ तासांमध्येच वीजजोडणी देण्यात आली.महावितरणने राज्यातील वीजग्राहकांसाठी नवीन वीजजोडणीसह विविध सेवा देणाऱ्या मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. या ग्राहक सेवांसाठी महावितरणअंतर्गत सुसंगत प्रक्रिया करण्यासाठी अभियंता-कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी मित्र अॅप, नवीन वीजजोडणी अॅप, लोकेशन कॅप्चर अॅप व मीटर रीडिंग अॅपची निर्मिती केली आहे. ते चारही मोबाईल अॅप कार्यान्वित करण्यात आले आहेत.
दरम्यान, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज मिळाल्यानंतर त्याची महावितरणअंतर्गत संपूर्ण प्रक्रिया ही आॅनलाईन करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्या ग्राहकांना नवीन वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधा नव्याने उभारण्याची गरज नाही ज्यांच्या जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होते, त्यांना लवकरात लवकर वीजजोडणी देण्याचे निर्देश व्यवस्थापनाने दिले आहेत. महावितरणच्या नवीन वीजजोडणी अॅपच्या माध्यमातून सोलापूर शहर विभागातील २३, अकलूज विभागातील ५ व पंढरपूर विभागातील ४ अशा एकूण ३२ ग्राहकांना त्यांनी अर्ज केल्यानंतर फक्त २४ तासांत वीजजोडणी देण्यात आली.
कार्यालयीन कार्यवाहीदेखील अॅपव्दारे सुपरफास्ट
नवीन वीजजोडणीसाठी आॅनलाईन अंतर्गत प्रक्रिया करण्यात येते. यात आता मोबाईल अॅपचा समावेश झाला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची कार्यालयीन कार्यवाहीदेखील आता अॅपद्वारेच होत आहे. ग्राहकाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर लगेच नवीन वीजजोडणी अॅपद्वारे ग्राहकाच्या घरी तांत्रिक तपासणीची प्रक्रिया सुरू केली जाते. ही प्रक्रिया मोबाईल अॅपद्वारेच पूर्ण करून ग्राहकांना लगेच फर्म कोटेशन देण्यात येते. ग्राहकाने कोटेशन त्वरित भरणा केल्यास पुन्हा अॅपद्वारेच ग्राहकाच्या घरी मीटर लावून नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. तसेच बिलिंग प्रणालीतही त्याची अॅपद्वारेच नोंदणी घेण्यात येऊन पुढील महिन्यापासून संबंधित ग्राहकांना देयक देण्यास प्रारंभ होतो. अशा प्रकारे सर्व प्रक्रिया मोबाईल अॅपद्वारे पूर्ण करून ३२ ग्राहकांना २४ तासांच्या आत वीजजोडणी देण्यात आली.
'मी गुरूवारी सकाळी ८ वाजता अर्ज केला. सर्व फॉर्म भरून दिले. त्यानंतर मला अर्धा तास थांबा. खांबापासून घराचे किती अंतर आहे व इतर बाबींचा सर्व्हे करून येतील, असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. आवश्यक कागदपत्रांची यादी मला देण्यात आली. मी ९ वाजता सर्व कागदपत्रे घेऊन गेलो. त्यानंतर सर्व्हे करून कर्मचारी परतले आणि मला त्यानुसार कोटेशन देण्यात आले. मी १ वाजता कोटेशन भरून दीड वाजता त्याची पावती सादर केली. महावितरणचे कर्मचारी २ वाजता आले आणि मला वीजजोडणी दिली. ही सर्व प्रक्रिया इतकी तत्पर झाली की पहिल्यांदा इतक्या जलद काम झाले. त्याबद्दल मी महावितरणचा मनापासून आभारी आहे.'
- ईलाजी ताजुद्दीन शेख, रा़ वेळापूर, ता़ माळशिरस, जि़ सोलापूऱ
सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील गुलाब सूर्यगंध यांना तर अर्ज केल्यापासून अवघ्या ४ तासांत वीजजोडणी कार्यान्वित करून मिळाली. सकाळी १० वाजता त्यांनी मेडशिंगी शाखा कार्यालयात अर्ज केला होता. सर्व्हे, कोटेशन आदी प्रक्रिया पूर्ण करून २ वाजेपर्यंत त्यांच्या घरी मीटर बसवून वीजपुरवठाही सुरू झाला. ते म्हणाले की, 'महावितरणच्या तत्पर सेवेमुळे कार्यालयात वारंवार चकरा मारणे व प्रवासासाठी लागणाऱ्या खचार्ची बचत झाली. त्याबद्दल महावितरणचा मी आभारी आहे.
- गुलाब सुर्यगंध, रा़ वाडेगांव, ता़ सांगोला, जि़ सोलापूर.
या टीमने केली कार्यवाही
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश कोळी, उपविभागीय अभियंता ए.डी. कांबळे, ए.वाय. कोंडगुळे, अकलूज विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावर, उपविभागीय अभियंता रवींद्र भुतडा, पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सानप, उपविभागीय अभियंता श्रीनिवास लिपारे, नंदकुमार सोनंदकर व सहका-यांनी ही कामगिरी पार पाडली. या कामगिरीबद्दल व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी सोलापूर मंडलाच्या चमूचे कौतुक केले आहे