ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 2 - ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थेतही डिजिटल तंत्रज्ञानाची उपयोगिता सिद्ध करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेने पाऊल उचलले आहे. गरोदर माता आणि बाळाच्या संगोपनासाठी मोबाईल अॅप जिल्हा परिषद लाँच करणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच नागपूर जिल्हा परिषदेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. संगोपन मोबाईल अॅप नावाने हा अॅप विकसित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व आयसीटी मीडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त उपक्रमातून ही यंत्रणा जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात मातामृत्यू, बालमृत्यू कमी करण्यासाठी आशा वर्कर, आरोग्यसेविका कार्यरत आहे. गरोदर मातेपासून तर बाळाच्या जन्म झाल्यानंतर तो पाच वर्षांचा होईपर्यंत त्याची नोंद त्यांच्याकडे असते. परंतु एखादी महिला व बाळ जर गाव सोडून बाहेरगावी गेले असेल, अशावेळी आरोग्यसेविका काहीच करू शकत नाही. गरोदर मातेला तिच्या आरोग्याची काळजी घ्यायला लावणारे, तसेच शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना वेळोवेळी लागणाऱ्या लसीकरणासाठी माहिती व मदत संगोपन अॅप करणार आहे. संगोपन अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर माता व बाळाची संपूर्ण माहिती त्यात भरावयाची आहे. ही माहिती अॅपमध्ये नोंदविल्यानंतर गरोदर मातांना प्रसूतीच्या दरम्यानपर्यंत घ्यावी लागणारी काळजी, आवश्यक लसीकरण तसेच बाळाला सुद्धा त्याच्या जन्मानंतर व पाच वर्षापर्यंत प्रत्येक वर्षात करविण्यात येणारे लसीकरणाची माहिती वेळेत देणार आहे. एकप्रकारे हा अॅप माता आणि बाळाच्या आरोग्यासंदर्भात आठवण करून देणार आहे.
माता आणि बाळाच्या संगोपनासाठी मोबाईल अॅप
By admin | Published: January 02, 2017 9:43 PM