मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:58 PM2024-11-19T12:58:43+5:302024-11-19T12:59:49+5:30
२० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास मनाई करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदेशीर नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली.
२० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाइल फोन वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. या निर्णयाला व्यवसायाने वकील उजाला यादव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
मुख्य न्या.देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या.अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. तसेही निवडणूक प्रक्रिया पार पाडणे, हे जिकरीचे काम आहे आणि त्यात तुम्ही डिजिलॉकरमधील कागदपत्रे दाखविण्यास परवानगी देण्याची मागणी करत आहात. फोनद्वारे डिजिटल लॉकरमधील कागदपत्रे दाखविण्याचा अधिकर नागरिकांना नाही. निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदा नाही, असे खंडपीठाने याचिका फेटाळताना म्हटले.