पुणे : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय यांच्या नावाने पोस्टाच्या पार्सलद्वारे एका उर्दु पुस्तकातून मोबाईल पाठवल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती.या प्रकरणात आर. कृष्णमूर्ती (रा. डीएन. रोड, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तुरुंगरक्षक ज्ञानेश्वर गोरखनाथ दुबे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका उर्दु पुस्तकात हा मोबाईल पाठवण्यात आला होता. पोस्टाद्वारे आलेले हे पार्सल मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी रमेश शिवाजी उपाध्याय उर्फ मेजर यांच्या नावाचे होते. हे पार्सल कृष्णमूर्ती याने पाठवल्याचे तपासाणीत पुढे आले आहे.पार्सल मुंबईवरुन पाठवण्यात आलेले असून, नागपूरसह राज्यातील कारागृहांमध्ये मोबाईल सापडल्याचे प्रकार उघड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहात हे पार्सल आले आहे. उपाध्याय, साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहीत यांच्यावर २००८ मध्ये मालेगावात बॉम्बस्फोट घडवल्याचा गुन्हा दाखल आहे. उपाध्याय सध्या येरवडा कारागृहात आहे. शुक्रवारी संध्याकाळी आलेले हे पार्सल शनिवारी सकाळी स्कॅनरच्या सहाय्याने तपासण्यात आले. (प्रतिनिधी)
येरवडा कारागृहातही पार्सलमध्ये मोबाइल
By admin | Published: April 27, 2015 3:47 AM