पुणे : मद्य प्राशन करून गाडी चालविण्याबरोबरच, गाडी चालविताना मोबाईलवर संभाषण करण्याची कसरत चांगलीच महागात पडू शकते. प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) मद्य प्राशन करून, गाडी चालविणाऱ्या एक हजार, तर मोबाईलवर बोलणाऱ्या दोन हजार गाडीचालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली आहे. अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. सिग्नल तोडणे, झेब्राक्रॉसिंगचे नियम डावलणे व वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्यांची संख्यादेखील काही कमी नाही. अगदी कानाला मोबाईल लावून एकप्रकारे जीवघेणी कसरत करीत वाहन चालविले जात असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळते. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जाते. त्यांचा परवाना निलंबित करण्याबाबत परिवहन विभागाला कळविण्यात येते. गेल्या काही वर्षांत अशा बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येत वाढ होत आहे. या वर्षभरात शहरातील ३८८ वाहनचालकांवर, तर ६६६ जणांवर वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्याप्रकरणी परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर गेल्या तीन वर्षांत मद्यपान केलेल्या १ हजार ५० व मोबाईलवर बोलणाऱ्या १ हजार ९६९ वाहनचालकांचे परवाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली. काय होते शिक्षा? वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास ३ महिने, तर मद्य प्राशन करून वाहन चालविल्यास सहा महिने परवाना निलंबित करण्यात येतो.‘ब्लू टूथ’वर बोलणेही गुन्हाच काही वाहनचालक कान व खांद्याचा चिमटा करीत वाहन चालविताना दिसतात, तर काही दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालक ब्लू टूथवर संवाद साधताना दिसतात. प्रत्यक्षात हातात मोबाईल नसला, तरी कानाला ब्लू टूथ डिव्हाईस लावलेले असते. दोन्ही हात वाहन चालवण्यास मोकळे असले, तरी चालकाचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहन चालविताना ब्लू टूथचा वापरही गुन्हाच ठरतो.