भंडारा - सध्याच्या युगात प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. परंतु हाच मोबाईल तुमच्या जीवावर बेतू शकतो हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना. कारण भंडाऱ्यात घडलेल्या एका दुर्घटनेत तरुणाचा जीव वाचला आहे. पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईल अचानक पेट घेतल्यानं युवक जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सौंदळ पुनर्वसन येथील ही घटना आहे.
अंकित भुते असं या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. या दुर्घटनेत अंकित किरकोळ जखमी आहे. नेहमीप्रमाणे सकाळी घरातून निघताना अंकितनं मोबाईल खिशात ठेवला होता. गावातील सांस्कृतिक कार्यक्रमात असताना अचानक अंकितला काहीतरी जळण्याचा भास झाला. त्याने खिशात हात घालून पेटलेला मोबाईल बाहेर फेकून दिला. मात्र या घटनेत अंकितच्या मांडीला मोठी जखम झाली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ अंकितला हॉस्पिटलला नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले.
या दुर्घटनेत अंकितच्या पायाचा काही भाग जळाला. त्याला उपचार करून घरी पाठवण्यात आले. याबाबत अंकित म्हणाला की, मी मोबाईल घेऊन जवळपास १४-१५ महिने झाले आहेत. आतापर्यंत काही समस्या जाणवली नाही. विवो कंपनीचा हा मोबाईल आहे. मी ओव्हर चार्जिंगही केली नव्हती असं त्याने म्हटलं.
...नाहीतर मोबाइलचा स्फोट होऊ शकतोथर्ड पार्टी चार्जरः बर्याचदा लोक थर्ड पार्टी चार्जर वापरतात, जे मोबाईलला आग लागण्याचे एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होतो. थर्ड पार्टी चार्जरमध्ये बरेच पार्ट नसतात, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत फोनचे हार्डवेअर खराब होऊ शकते किंवा चार्जिंग दरम्यान, त्याचे तापमान वाढू शकतं. यामुळेच स्मार्टफोनचा स्फोट होण्याची दाट शक्यता असते.
ओव्हर हिटिंगपासून बचाव: स्मार्टफोन अनेकदा गरम होतात आणि चार्जिंग दरम्यान ही समस्या मोठं रूप धारण करू शकते. अशा परिस्थितीत फोनचे तापमान नियंत्रणात ठेवलं पाहिजे हे लक्षात ठेवा. यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनचे कुलिंग पॅड देखील वापरू शकता.
फोनला जास्तवेळ सूर्यप्रकार ठेवू नका: स्मार्टफोनला तासनतास थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. अशा स्थितीत स्मार्टफोनचे तापमान वेगाने वाढू शकते आणि त्याची बॅटरी फुटू शकते.
मॅन्युफॅक्टरिंग फॉल्ट: अनेक वेळा कंपनीच्या चुकीमुळे स्मार्टफोनला आग लागते आणि त्याची बॅटरी फुटते. अलीकडे वनप्लस फोनला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
यूझर्सची चूक: अनेकदा यूझर्सच्या चुकीच्या वापरामुळे स्मार्टफोन पेटतो. अशा परिस्थितीत वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे आणि ही सर्व संभाव्य कारणे आहेत.