प्रकाश लामणे
पुसद (यवतमाळ), दि. २० - कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकाराचा चक्क पाकीट आणि मोबाईल चोरीत सहभाग उघड झाला आहे. त्याने सुमारे सव्वालाख रुपये किंमतीचे १३ मोबाईल आतापर्यंत चोरी केल्याची कबुली पुसद पोलिसांना दिली आहे.
साहील संजय भोजले (१९) रा. सवना ता. महागाव जि. यवतमाळ असे या कीर्तनकाराचे नाव आहे. साहील महाराज (सवनेकर) म्हणून तो प्रसिद्ध आहे. पुसद शहरालगतच्या श्रीरामपूर येथील एका घरातून पॉकीट चोरण्याच्या प्रयत्नात असताना पुसद पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आतापर्यंत विविध ठिकाणावरुन एक लाख २२ हजार १०० रूपये किंमतीचे तब्बल १३ मोबाईल हॅन्डसेट चोरल्याची कबुली दिली. त्याच्या या कबुलीने पुसद पोलीस चांगलेच चक्रावले. या महाराजांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश ददिले. त्यानंतर पोलिसांकडून सध्या या महाराजाची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात यवतमाळला करण्यात आली आहे. ही कारवाई प्रभारी ठाणेदार धीरज चव्हाण, दीपक ताटे, नंदू चौधरी, भगवान डोईफोडे, रवींद्र गावंडे यांनी पार पाडली.महाराज चक्क यु-ट्यूबवर यवतमाळ जिल्ह्यात प्रख्यात कीर्तनकार म्हणून ओळख निर्माण केलेल्या परंतु आता पाकीट व मोबाईल चोरीत सापडलेल्या साहिल महाराज भोजले याचे कीर्तन चक्क यू-ट्युबवरसुद्धा उपलब्ध आहे. अशा या आॅनलाईन महाराजांची ही ह्यअनोखी कामगिरीह्ण पोलिसांसह सर्वांनाच अचंबित करणारी ठरली आहे. पुसद विभागातील सलग दुसरा महाराजकीर्तनकाराचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग आढळण्याचा पुसद विभागातील हा सलग दुसरा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. काही महिन्यांपूर्वी यवतमाळातील दारव्हा रोड स्थित सतीश फाटक यांच्याकडे पडलेल्या दरोड्यातही पुसद तालुक्यातील एका महाराजाच्या टोळीचा सहभाग आढळून आला होता. सदर महाराज या टोळीचा म्होरक्या निघाला. तो फरार आहे. उत्तर प्रदेशात त्याने आश्रय घेतला असावा, असा पोलिसांना संशय आहे. धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान देणारा, सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारा आणि विविध निवडणुकांमध्ये सतत पुढाकार घेणारा हा महाराज चक्क दरोडेखोरांच्या टोळीचा सूत्रधार निघाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्याची चर्चा आणि शोध सुरू असताना पुसद विभागात आणखी एका कीर्तनकाराचे गुन्हेगारी कृत्य पुढे आल्याने नागरिकांनी आता कुणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.