मुंबई : फुले, शाहू आणि आंबेडकर हे आधुनिक गुरू आहेत. त्यांची शिकवण बदलत्या काळातही लागू पडते. जर चांगल्या गुरूंच्या शोधात असाल तर यांच्या शिकवणीची कास धरा, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे अभ्यासक आणि प्राध्यापक रमेश पांडव यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठात आयोजित व्याख्यानात केले. चर्चगेट येथील नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठात मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांवर प्रकाशझोत टाकण्याासाठी ‘आंबेडकर आणि राष्ट्रीय एकात्मता’ व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी प्राध्यापक रमेश पाडंव बोलत होते. याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी, कुलसचिव एस. पी. बडगुजर, प्राध्यापिका मधुरा केसरकर उपस्थित होते. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीविषयी पांडव म्हणाले, की डॉ. आंबेडकरांनी अनेक उपाययोजना त्यांच्या कारकीर्दीतच आखल्या होत्या. आता त्या उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. त्यातूनच बाबासाहेबांच्या तल्लख बुद्धीचा अंदाज येतो. शिक्षणाविषयी पांडव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मांडली. ते म्हणाले की, डॉ. आंबेडकर १८ तास वाचन करीत, पण आता एक पान जरी वाचायचे म्हटले तरी जमत नाही. बाबासाहेब शिक्षणाबद्दल आग्रही होते. तो आदर्श जरूर घ्या. अध्यासन केंद्राचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यासन केंद्राच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या शिकवणीचा प्रसार, प्रचार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)>सांताक्रूझ कॅम्पसमध्ये वसतिगृह उभारणारएसएनडीटी महिला विद्यापीठात राज्यभरातून विद्यार्थिनी येतात; पण राहण्याची सोय नसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला जातो. ही अडचण ओळखून सांताक्रूझ कॅम्पसमध्ये वसतिगृह उभारून देण्याची मागणी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना केली. बडोले यांनी देखील ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. येत्या काही काळात वसतिगृह उभारले जाईल.
फुले, शाहू आणि आंबेडकर हे आधुनिक गुरू
By admin | Published: August 04, 2016 1:52 AM