नारायण चव्हाण
सोलापूर : पतीची नोकरी गेलेली... त्यात त्यांचे यकृत निकामी झाले...... आजारपणामुळे आधीच मोठा खर्च झालेला ...... डॉक्टरांनी सांगितले यकृत प्रत्यारोपण करण्याची गरज आहे ....त्याशिवाय जगणे अशक्य....... अशा स्थितीत ती जिद्दीने कामाला लागली. स्वत:चे यकृत देऊन पतीला जीवनदान द्यायचा निर्णय घेतला आणि नियतीनेही तिला साथ दिली ही कथा आहे अक्कलकोट तालुक्यातील मराठवाडीच्या संजीवनी निंबाळकर यांच्या जिद्दीची.
मराठवाडी येथील अशोक भवानबा निंबाळकर हे एम. ए. बीएड. असून ते शिक्षक होते . काही कारणाने त्यांची नोकरी गेली. कधी लॉटरी सेंटरवर तर कधी मिळेल ते काम करून त्यांनी संसाराचा गाडा हाकायला सुरुवात केली. पत्नी संजीवनी या दहिटणे येथील ज्ञानगंगा प्रशालेत शिक्षिका आहेत. कुटुंबाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी त्यांच्यावरच. त्यात दोन मुलींचे शिक्षण. मोठी मुलगी दहावीला तर छोटी छोटी सहावीच्या वर्गात शिकत होती.
फेब्रुवारी महिन्यात अशोकरावांच्या प्रकृतीची तक्रार सुरू झाली. उलटी, जुलाब, झोप न लागणे , हातापायांना कंप , अस्वस्थपणा, नाकातोंडातून रक्त आणि पोट फुगणे सुरू झाले. अक्कलकोटच्या फॅमिली डॉक्टरकडे इलाज सुरू झाला. काविळीचे निदान झाले. आजार वाढत गेला .हैदराबादच्या रेड्डी हॉस्पिटलमध्ये ८-९ लाखांचा खर्च झाला पण आजार काही कमी होत नव्हता. शेवटी सोलापुरातच उपचार घेण्याचे ठरले .
काविळीमुळे अशोकरावांचे यकृत (लिव्हर) खराब होत चालले. डॉक्टरांनी जवळपास ते निकामी झाल्याचे सांगितले आणि संजीवनी पुढे आल्या. पतीसाठी यकृत देण्याचा निर्णय घेतला. स्वत:चा रक्तगट तपासून घेतला. रक्तगट जुळला. पण नातेवाईकांनी विरोध केला. वय लहान. दोन मुलींचे भविष्य समोर होते. माहेरकडून चलबिचल सुरू झाली, पण त्यांचा निर्धार पक्का होता.
पती हाच माझा परमेश्वर. मला माझ्या परमेश्वराची सेवा करण्याचे भाग्य लाभले. यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे.य् ाा प्रवासात अनेकांची साथ लाभली त्यांचे ऋण व्यक्त करता येत नाही .आज वटसावित्रीची पूजा करताना 'तो दिवस ' आठवतो . -संजीवनी अशोक निंबाळकर
आजार बळावत गेल्याने मीही जगण्याची आशा सोडली होती. माझ्या पत्नीने मला सावरले. आईने मला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वी तिचा मृत्यू झाला. पण माझ्या संजीवनीने मला पुनर्जन्म दिला. माझ्यसाठी ती साक्षात देवता ठरली .-अशोक भ . निंबाळकर