अतुल चिंचलीलोकमत न्यूज नेटवर्क पुणे: वडाच्या झाडाची फांदी तोडून पूजा करावी असे कुठल्याही धर्मशास्त्रात सांगितलेले नाही. मात्र, शहरीकरणाच्या युगात वडाच्या झाडापर्यंत पोहोचणे अवघड झाल्याने अनेकजणी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी वडाच्या फांद्या विकत घेतात. नवऱ्याचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि पुढचे सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी साजऱ्या होणारी ही ‘मॉडर्न वटपौर्णिमा’ वटवृक्षांचा बळी घेणारी ठरु लागली आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. यादिवशी विवाहित स्त्रिया पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्यी मिळावे म्हणून वडाला पुजतात. मात्र वडाचे झाड शहरीकरणात दुर्मिळ झाले आहे. वडाचे झाड गाठण्यासाठी भरपूर वेळ खर्च करावा लागतो. यावर पर्याय म्हणून घरातच वडाची फांदी आणून ती पुजण्याची प्रथा पडू लागली आहे. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शहरांमधल्या मंडईत वडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. वटपौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर या फांद्या तोडल्या जातात. सिंहगड रस्ता, धायरी, खडकवासला तसेच घाट परिसरातल्या वडाच्या फांद्या पुण्यात विक्रीस आणल्या जातात. वटपौर्णिमेच्या पूजा साहित्यबरोबरच या फांद्यांची विक्री केली जाते. प्रत्येक फांदी दहा रुपये दराने विकली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळपर्यंत या फांद्याची विक्री चालू असते. विकल्या न गेलेल्या फांद्यांचा पुढे काहीही उपयोग होत नसल्याने त्या फेकून दिल्या जातात.चौकटतोडण्यापेक्षा लागवड करा‘‘वडाचे झाड जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन देते. तो आपल्याला मिळावा या हेतूने वडाला फेºया मारण्याची प्रथा पडली. वडाच्या फांद्या घरी घेऊन जाण्याने, त्याची पूजा करुन ती फेकुन दिल्याने हा लाभ मिळत नाही. उलट झाडाची हानी होते. याबाबत स्थानिक वृक्षप्राधिकरण आणि जैवविविधता मंडळ यांनी कायदे केले पाहिजेत. झाडांना अपाय करून व त्यांची पूजा करून झाड प्रसन्न होणार नाही. सध्या शहरात सर्व ठिकाणी हिरवाई वाढवणे गरजेचे आहे. स्त्रियांनी सरकारी किंवा खाजगी वनखात्यातून वडाची रोपे घेतली पाहिजेत. या रोपांची पूजा करुन पुजेनंतर ते रोप घरासमोर, परिसरात लावून वडाला जीवनदान द्यायला हवे.’’ -डॉ सचिन पुणेकर, पर्यावरणतज्ञ चौकट फांद्याना मोठी मागणी‘‘आम्ही दोन दिवसासाठी १०० ते १२० फांद्या आणतो. शहरात वडाच्या फांदीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शहरातून फांद्या तोडून दिल्या जात नाहीत म्हणून शहराबाहेरुन फांद्या तोडून आणतो. मंडई व पिंपरी चिंचवडमध्ये फांद्यांची विक्री होते. एक विक्रेता दोन दिवसात शंभर-दीडशे फांद्या विकतो.’’ -राजीव गाजरे, विक्रेता चौकट वडाचे महत्त्व निसर्गत:च दीघार्युषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांच्या पूजनाची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली. वड मोठयाा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करते. वडाची झाडे आधिक प्रमाणात असणाऱ्या प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पर्यावरण रक्षणात वड महत्त्वपूर्ण आहे.वटवृक्ष हा आपला ‘राष्ट्रीय वृक्ष’ आहे. मात्र वाढत्या शहरीकरणमुळे वडासाहित अनेक देशी वृक्ष तोडले जात असल्याने पशु-पक्ष्यांचा निवारा नष्ट होतो आहे.