शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

मोदींना संघ-भाजपा लवकरच हटवेल!

By admin | Published: October 23, 2016 2:55 AM

गरिबीतून वर येऊन नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदापर्यंत मारलेली झेप अभिमानास्पद आहे. त्यांचे कामदेखील चांगले आहे. मात्र त्यांची काम करण्याची पद्धत व त्यांचे स्वत:चे धोरण

- हर्षवर्धन आर्य/गजानन जानभोर/नंदू पुरोहित/ योगेश पांडे

नागपूर -  गरिबीतून वर येऊन नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदापर्यंत मारलेली झेप अभिमानास्पद आहे. त्यांचे कामदेखील चांगले आहे. मात्र त्यांची काम करण्याची पद्धत व त्यांचे स्वत:चे धोरण यामुळे ते या पदावर जास्त काळ टिकणार नाहीत. त्यांच्याविरोधातील नाराजी बघता संघ व भाजपाच त्यांना या पदावरून लवकरच हटवतील, असा दावा माजी खासदार व ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी केला. पत्नी विजयाताई धोटे यांच्यासह जांबुवंतराव ‘लोकमत’ कार्यालयात सदिच्छा भेटीला आले होते. त्या वेळी त्यांनी ही सडेतोड मुलाखत दिली. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा या वेळी उपस्थित होते. सुभाषचंद्र बोस यांचे अनुयायी, गोरगरिबांचे कैवारी, ज्यांच्याजवळ जाण्यास पोलीसही घाबरायचे असा दरारा असणारे, सभापतींवर पेपरवेट फेकून मारताना तो त्यांना लागू नये, याची काळजी घेणारे, प्रसंगी उपाशीपोटी झोपणारे, निसर्गावर आणि साहित्यावर प्रेम करणारे, स्वत: नाटकात अभिनय करणारे आणि विदर्भ बंद, वा रे शेर, आ गया शेर.. अशी विविध रूपांनी ओळख असणारे धोटे यांनी मुलाखतीदरम्यान विविध मुद्द्यांवर आपल्या शैलीत परखड भाष्य केले.अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्ष व संघाच्या धोरणांविरोधात कारभार करीत असल्याचे दिसते. विदर्भाच्या मुद्द्यावरदेखील त्यांनी पक्षाच्या भूमिकेला बाजूला सारले. भाजपाने राष्ट्रीय अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा ठराव संमत केला. मात्र वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आमच्या अजेंड्यावरच नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. भाजपाच्या धोरणांविरुद्ध मोदी बोलत आहेत. लहान राज्यांच्या निर्मितीला संघही अनुकूल आहे. मात्र मोदींच्या या वागण्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपा व संघातून असंतोष उफाळून येईल, असे धोटे म्हणाले. मोदींविषयी तुमचे मत काय? भाजपात सर्वांत चांगले धोरण पंतप्रधान मोदी यांचेच आहे. त्यांनी जगात आपली छाप सोडली आहे. मोदी संघविचारातून वर आले असले तरी त्यांना महात्मा गांधीच भावतात. म्हणूनच तर अमेरिकेत त्यांनी हेडगेवार, गोळवलकर किंवा सावरकर यांची नव्हे, तर महात्मा गांधींची स्तुती केली. मला भाजपाने नव्हे, तर गंगेने वाराणसीत निवडणूक लढविण्यासाठी बोलविले होते, हे त्यांचे वक्तव्य प्रभावित करणारे ठरले होते.जर या सरकारने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा मार्गी लावला नाही, तर..? तर पुढील लोकसभा-विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विदर्भात पूर्णपणे सफायाच होईल. विदर्भाच्या भाजपाकडून आशा होती, वेगळा विदर्भ होईल, हा अद्यापही मला विश्वास आहे. मी निराश झालेलो नाही, मात्र उदास नक्कीच आहे. गडकरी, फडणवीस यांच्या आश्वासनांवर विश्वास नाही. कारण सर्व सूत्रे केंद्राच्या हाती आहेत. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी केंद्रातून पावले उचलली गेली पाहिजेत.वेगळ्या विदर्भाचे स्वप्न आणखी कोणामुळे भंगले असे आपल्याला वाटते?वेगळ्या राज्याच्या निर्मितीसाठी राजकीय वातावरण अनुकूल असताना केवळ सत्तेच्या मोहापोटी स्वतंत्र विदर्भाचे घोंगडे भिजत पडले आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकभावनेपेक्षा सत्तेला जास्त महत्त्व दिले. महाराष्ट्रात सत्ता कायम राहावी या आग्रहामुळे त्यांच्या कार्यकाळात वेगळ्या विदर्भाचे स्वप्न भंगले. वेगळ्या विदर्भाची सर्वांत पहिली मागणी काँग्रेसनेच केली होती. काँग्रेसच्या प्रत्येक महाअधिवेशनात याबाबत प्रस्ताव संमत झाला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात विदर्भ राज्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. राज्य पुनर्गठनासाठी तयार करण्यात आलेल्या फजल अली आयोग तसेच धर आयोगाने वेगळा विदर्भ झाला पाहिजे, असा अहवाल सादर केला होता. याअगोदर नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ‘जेव्हीपी’ समिती गठित करण्यात आली होती. या समितीत स्वत: नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल तसे पट्टाभि सीतारामय्या सहभागी होते. या समितीनेदेखील स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, अशी शिफारस केली होती. मात्र संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा समावेश झाला. जर त्या वेळी विदर्भ वेगळे राज्य केले असते तर महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आली नसती. त्यामुळे त्या वेळी नेहरूंनी वेगळा विदर्भ होऊ दिला नाही. त्यांनी हे जाहीरपणे कबूलदेखील केले होते. भाजपानेदेखील भुवनेश्वर येथील अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव संमत केला होता. १९९६च्या निवडणूक घोषणापत्रात स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे वचन देण्यात आले होते. अटल बिहारी वाजपेयी यासाठी अनुकूल होते. मात्र शिवसेनेसोबत युती झाली आणि सत्ता टिकविण्यासाठी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा गुंडाळून ठेवण्यात आला. त्या वेळी वाजपेयींनी निर्धार केला असता, तर छत्तीसगड, उत्तराखंड व झारखंडसोबत विदर्भ वेगळे राज्य म्हणून जन्माला आले असते. आज विदर्भवादी एकत्र येत नाहीत. त्याबद्दल काय सांगाल?वामनराव चटप, राजकुमार तिरपुडे, श्रीहरी अणे यांनी विदर्भाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. विदर्भाच्या नावाखाली वेगवेगळे पक्ष स्थापन करून निवडणुका लढणे ही मोठी घोडचूक ठरेल. विदर्भविरोधकांच्या हातात यामुळे आयतेच कोलीत मिळेल. विदर्भवाद्यांनी एकत्र येऊन एकाच झेंड्याखाली निवडणुका लढवाव्यात, असे माझे स्पष्ट मत आहे.राज्यात युतीचे सरकार आहे. त्याबद्दल आपले मत काय आहे? राज्यात शिवसेना व भाजपाची युती असली तरी ते सत्तेखातर एकमेकांसोबत आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधून विस्तवदेखील जात नाही. भाजपाने ही युती तोडण्याचे ठरविले असून, पक्षातीलच एका वरिष्ठ नेत्याने हे सांगितले आहे. ही युती तुटली तर वेगळ्या विदर्भाच्या दृष्टीने वेगाने पावले उचलली जाऊ शकतील.बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही जवळून पाहिले आहे. काय सांगाल त्याबद्दल?शिवसेना संकटात असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याकडे येऊन सभांमध्ये गर्दी कशी जमवावी, अशी विचारणा केली होती. मी त्यांना याबाबत ‘मंत्र’ दिला होता. आम्ही सोबत सभा केली होती. शिवाजी पार्कात झालेल्या त्या सभेत आमच्यासोबत दलित पॅँथरचे नेते नामदेव ढसाळदेखील होते. त्या सभेनंतर एका वर्तमानपत्राने बातमीचा मथळा दिला होता. ‘लॉयन, टायगर अ‍ॅण्ड पँथर’.शिवसेनेतदेखील विदर्भाच्या विकासाच्या आशेने गेलो होतो. मात्र वेगळे विदर्भ राज्य झाले तर स्व. जवाहरलाल दर्डा, बनवारीलाल पुरोहित व इतर हिंदीभाषिक नेत्यांच्या हाती विदर्भाची सत्ता येईल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मी कधीही जाती, धर्म, भाषा किंवा प्रांत लक्षात ठेवून राजकारण केले नाही. त्यामुळे मला त्यांचा मुद्दा पटला नाही व मी थेट राजीनामा दिला.तुम्हाला कधी सत्तेत जावे असे वाटले नाही का?मी सुरुवातीपासून साधे आयुष्य जगत आलो आहे. मी पाच वेळा आमदार व दोन वेळा खासदार होतो. मात्र मी सुरुवातीलाच काही तत्त्व ठरविले होते. कपड्यांना कधीही खिसे नव्हते आणि नाहीत. मी सोन्याची अंगठीदेखील घालत नाही व कुठलीही संस्था उघडून पैसे कमविले नाही. मी तत्त्वांशी प्रामाणिक राहिलो. आजदेखील नागपुरात माझे घर नाही.मला देशाचा संरक्षणमंत्री, रेल्वेमंत्री बनण्याची संधी होती. इतकेच काय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचीदेखील ‘आॅफर’ दिली होती. मात्र मला कधीच सत्तेचा मोह नव्हता. उलट वसंतदादा पाटील व ए.आर. अंतुले यांना मुख्यमंत्री बनविण्याचा मीच आग्रह धरला होता.काँग्रेसमध्ये असताना मी अनेक नेत्यांना मोठमोठ्या पदांवर बसविले. इंदिरा गांधींनी तर मला संरक्षण मंत्रिपद देण्याचा विचार केला होता. मात्र सत्तेच्या समीकरणांसाठी अचानक मला रेल्वेमंत्रिपद घ्या, असे सांगण्यात आले. इंदिरा गांधींनी आश्वासन दिले होते की वेगळे विदर्भ राज्य देऊ. मात्र त्यांनी माघार घेतली. त्यामुळे मी लगेच माझा राजीनामा दिला.त्या काळातली तुमची एखादी आठवण...राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना मी जवळून पाहिले आहे. दोघेही इंदिरा गांधी यांच्या मनातील नेमका मुद्दा ओळखायचे. त्यांच्या या स्वभावगुणांमुळे काँग्रेसमध्ये त्यांचे प्रस्थ वाढले आणि पक्षसंघटनेसाठीदेखील त्यांनी बरेच काम केले. काँग्रेस पक्षातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ या वर्तमानपत्राची स्थिती लक्षात घेता इंदिरा गांधी यांनी स्व. जवाहरलाल दर्डा यांनी ते चालविण्याची जबाबदारी घ्यावी, असा आग्रह केला होता. मात्र दर्डा यांनी माजी मंत्री व आमदार सुरेशदादा जैन यांना त्याचा अभ्यास करायला सांगितला. जेव्हा त्याच्या आर्थिक ताळेबंदांचा सखोल अभ्यास त्यांनी केला, तेव्हा तेथे ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी स्थिती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथे वर्चस्व असणाऱ्या लोकांनी याच्या पुनरुज्जीवनासाठी फारसा रस दाखविला नाही. त्यामुळे जवाहरलालजींना आपली पावले मागे घ्यावी लागली.अनेकांना घडविणारा ‘किंगमेकर’ आज मागे पडला असे वाटत नाही का?आंदोलनांमध्ये चढउतार येतच असतात. कुठलेही आंदोलन सातत्याने एकाच गतीने चालू शकत नाही. सर्व जण पृथ्वीवर आलेले प्रवासी आहेत. मी सत्तेच्या मागे कधीच राहिलो नाही. स्वत:च्या तत्त्वांवर जगलो. आज माझा प्रभाव कमी झाला असला तरी एकूण कारकिर्दीबाबत मी समाधानी आहे. वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला यश मिळाले नाही, ही खंत मात्र कायम आहे. तुम्हाला विदर्भवीर ही पदवी कोणी दिली? ही उपाधी मला ‘मराठा’कार आचार्य प्र.के. अत्रे यांनी दिली. जवाहरलाल दर्डा, आबासाहेब पारवेकर, देवराव पाटील लोणीकर यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. मी माझ्यासोबत काम करणाऱ्यांना कधीही कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर सहकारी म्हणून वागविले. काँग्रेस पक्षाला ‘पंजा’ हे चिन्ह कसे मिळाले?काँग्रेसमधील फुटीनंतर इंदिरा गांधी यांनी काँग्रेस (आय)ची स्थापना केल्यानंतर पवनार येथील बैठकीत निवडणूक चिन्हाबाबत चर्चा झाली. अगोदर मी ‘सिंह’ हे चिन्ह काँग्रेसला (आय) देण्याचा सल्ला दिला. मात्र तेव्हा प्राण्यांना निवडणूक चिन्ह ठेवण्यावर बंदी होती. त्यानंतर मी चिन्ह म्हणून ‘मूठ’ दाखविली. तेव्हा तेथे उपस्थित आचार्य विनोबा भावे यांनी पंजा दाखविला. मी लगेच त्याला होकार दिला व इंदिरा गांधी यांनी त्याला संमती दिली, तेव्हापासून काँग्रेसला ‘पंजा’ हे चिन्ह मिळाले.तुमच्या आयुष्यात एखादी खटकणारी घटना कोणती आहे का? सुमारे दोन दशकांअगोदर मी व माझ्या काही समर्थकांनी ‘लोकमत’च्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली होती. त्या घटनेमुळे मी खूप व्यथित झालो होतो. आजदेखील ती घटना मला अस्वस्थ करते. भावनांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे ते पाऊल उचलले गेले. ती घटना माझ्या आयुष्यातील एक मोठा डाग आहे. त्या रात्री मी खूप रडलो होतो व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा व त्यांच्या कुटुंबीयांची माफीदेखील मागितली होती. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जवाहरलालजी दर्डा यांच्याशी फार जुने व जिव्हाळ्याचे नाते होते. आमच्यात गैरसमज झाले; पण ऋणानुबंध कमी झाले नाहीत. आजदेखील ज्या वेळी उदास वाटते तेव्हा मी रात्री त्यांची समाधी असलेल्या यवतमाळ येथील ‘प्रेरणास्थळी’ जाऊन बसतो. त्यांच्या आठवणींतून मला आजदेखील प्रेरणा मिळते.आपण तर ब्रह्मचारी होतात. मग लग्न कसे काय केले..?एकेकाळी मी आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी मी जमिनीवरच झोपत असे. दिवसातून १० वेळा आंघोळ करायचो. अगदी फकिरासारखे जीवन होते. अचानक श्रीमंत अशा आदिक कुटुंबात वाढलेली विजया माझ्या आयुष्यात आली. हाताशी असलेले सर्व ऐश्वर्य सोडून माझ्यासारख्या फकिरासोबतच लग्न करायचे हा तिचा आग्रह होता. माझे असे जगणे पाहून आमचे लग्न होऊ नये, यासाठी स्व. जवाहरलाल दर्डा, आबासाहेब पारवेकर, वसंतराव नाईक, नाशिकराव तिरपुडे यांनी खूप प्रयत्न केले. मी लग्न केले तर माझे अस्तित्व संकटात येईल, असे त्यांचे म्हणणे होते. रामराव आदिकांनीदेखील विजयाने हे लग्न करू नये म्हणून खूप समजावले होते. दरम्यान, विजयाचे लग्नदेखील आटोपले होते. मात्र जांबुवंतरावांसोबतच राहीन, ही तिची भूमिका कायम होती. लग्नानंतर १५ दिवस ती पतीच्या घरी राहिली. मात्र त्याला स्वत:जवळ फिरकूदेखील दिले नाही. ती चक्क गॅलरीत झोपत असे. अखेर मी तिला फोन केला आणि भेटायला येत असल्याचे सांगितले. रामराव आदिक व इतर काही सहकाऱ्यांसह मी दादर येथील तिचे लग्न झालेल्या घरी गेलो. मला पाहताच विजया एक सुटकेस घेऊन आली व माझ्या गाडीत जाऊन बसली. तेव्हापासून आम्ही सर्व सुखदु:खात सोबत आहोत. तिच्यामुळेच माझे ब्रह्मचर्य तुटले. मात्र तिने माझ्यासाठी खूप त्याग केला. विजया व मी कधीही अधिकृतपणे लग्न केले नाही. त्याची आम्हाला गरजच वाटली नाही. निसर्गाच्या साक्षीने आम्ही विवाहबद्ध झालो. ‘सागर किनारे, खुले आकाश के मंडप में’ अशा पद्धतीने आम्ही एकमेकांचे झालो. दोन मुली झाल्यानंतर मात्र शारीरिक संबंधांशिवाय प्रेम होऊ शकते का, असा प्रश्न एका वैद्यकीय तज्ज्ञांना केला होता. याचे उत्तर तुम्हीच शोधा, असे त्यांनी सांगितले होते. नंतर आम्ही भाऊ-बहिणीप्रमाणे राहण्याचा निर्णय घेतला. आता ती माझी आई आहे, माझी बहीण आहे...तुम्ही सुभाषचंद्र बोस यांचे अनुयायी आहात, तुमची पत्नी काँग्रेसच्या आणि तुमची मुलगी आता राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात आहे, घरी तुम्ही एकत्र कसे काय राहता..?सुभाषबाबू हे काँग्रेसवालेच होते आणि राष्ट्रवादीही मूळची काँग्रेसचीच. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही गुण्यागोविंदाने राहतो.गडकरी, फडणवीसांना मी घडविले!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, अटलबहादूर सिंह यांना मी घडविले. पशुवैद्यकीय डॉक्टर झाल्यानंतर डॉ. भागवत ज्या वेळी सरकारी नोकरीत होते, तेव्हा त्यांना तृतीय श्रेणीतून द्वितीय श्रेणीच्या पदावर मी आणले होते. नितीन गडकरी यांनादेखील मी राजकारणाचे धडे दिले. नागपूर विद्यापीठाच्या निवडणुकांत देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस, सरदार अटलबहादूर सिंह, नितीन गडकरी, नरेश पुगलिया यांच्यासोबत मी होतो. विदर्भसमर्थक शक्तींनी एकत्र येऊन श्रीकांत जिचकार यांची विद्यापीठात सत्ता येऊ दिली नव्हती. अटलबहादूर सिंह यांच्यासारखे नेते माझ्यामुळेच राजकारणात समोर आले. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनादेखील राजकारणात आणून मीच आमदार बनविले. तसेच वसंतराव साठे, विलास मुत्तेमवार यांनादेखील मीच खासदार बनविले. विलास मुत्तेमवार तर महापालिकेची निवडणूकदेखील जिंकू शकत नव्हते.माणिकराव ठाकरे अयशस्वी नेते!उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे विदर्भद्रोही आहेतच. विधानसभा निवडणुकांच्या वेळी विदर्भवाद्यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेला विदर्भात फारसे यश मिळाले नाही. यवतमाळमध्ये त्यांचा आमदार निवडून आला, तो माणिकराव ठाकरे यांच्यामुळे. मुळात माणिकराव ठाकरे हे अयशस्वी नेते आहेत. त्यांच्यामुळे शिवसेनेला फायदा पोहोचला होता, हे आम्ही कसे विसरणार? श्रीमंत दलितांच्या मुलांना आरक्षणाची गरजच नाहीआज देश जातीपातींमध्ये वाटला जात आहे. राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरते आहे. त्यांच्या मूक मोर्चांनी इतिहास घडविला आहे. दुसरीकडे ओबीसी, दलित मोर्चेदेखील निघत आहेत. मात्र जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची आवश्यकता नाही. वैश्य, ब्राह्मण यांच्यासह उच्चवर्णीय जातीतदेखील गरीब लोक आहेत.त्यांना आरक्षण नसल्याने त्यांच्यावर अन्यायच होत आहे. अनेक दलित आज आर्थिकदृष्ट्या श्रीमंत वर्गात मोडतात. त्यांच्या मुलांना खरोखरच आरक्षण घेण्याचा अधिकार आहे का? आरक्षणाबाबत सरसंघचालकांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादळ झाले. त्यांच्या वक्तव्यात काहीही वादग्रस्त नव्हतेच, असे माझे ठाम मत आहे.