शरद पवार यांचा घणाघात : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगूल नवी मुंबई : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे. केंद्रातील मोदी सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेतकरी देशोधडीला लागले आहेत. पोकळ घोषणाबाजी करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या प्रांगणात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्राच्या विविध भागांत दुष्काळ पसरला आहे. पिण्यासाठी पाणी नाही. गुरांना चारा नाही. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी केंद्राची टीम येऊन गेली. परंतु आजतागायत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. सरकारकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे. कामगारविरोधी निर्णय घेतले जात आहेत. माथाडी कायदा रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल पवार त्यांनी उपस्थित केला. केंद्र आणि राज्यातील भाजपप्रणीत सरकार जनतेच्या हिताला बगल देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील काही महिन्यात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरून जनमत मोदीविरोधी होऊ लागले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर देशात झालेल्या विविध पोटनिवडणुकीतून हे दिसून आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पराभवाने खचून न जाता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामांचा प्रचार व प्रसार करा, विजय आपलाच आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, मातंग समाजाचे नेते बाबासाहेब गोपले यांचीही भाषणे झाली. यावेळी आमदार संदीप नाईक, शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, महपौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)...तर राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधआघाडी सरकारने बनविलेल्या भूसंपादनाच्या सर्वव्यापी कायद्यात मोदी सरकारने बदल केले आहेत. हे बदल शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदारांच्या विरोधात आहेत. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्याला तीव्र विरोध केला जाईल, असे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
मोदींनी जनतेचा विश्वासघात केला
By admin | Published: March 08, 2015 2:25 AM