ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 27 - केंद्रात भाजपाला सत्तेत आणण्यात विश्व हिंदू परिषदेची महत्त्वाची भूमिका होती. राम मंदिरबाबत केंद्राकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. आपल्या स्वभावानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल कधी अचानकपणे घोषणा केली तर आश्चर्य वाटणार नाही. मात्र याचा अर्थ आम्ही राम मंदिरसाठी केवळ मोदींवरच अवलंबून आहोत, असा होत नाही. विहिंप राममंदिराबाबत देशभरात जनजागृती करतच राहणार, असे विहिंपचे संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन यांनी स्पष्ट केले.केंद्रात भाजपला सत्तेत आणण्यात विहिंपची महत्त्वाची भूमिका होती. सत्तेत आल्यापासून भाजपा राम मंदिर बांधण्याचे आश्वासन विसरली अशा चर्चा सुरू असतात. मात्र हुशार विद्यार्थी हा अभ्यासक्रमातील महत्त्वाचा मुद्दा कधीच विसरत नाही. म्हणूनच योग्य वेळ येताच अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आपले वचन सरकार पूर्ण करेल, असा विश्वास जैन यांनी व्यक्त केला. विहिंपच्या केंद्रीय व्यवस्थापन समिती व प्रतिनिधी मंडळाचे संयुक्त अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते.उत्तर प्रदेशात भाजपाला विहिंपचे पाठबळ२०१४ मधील लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपाचा प्रचार केला होता. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विहिंपचे कार्यकर्ते भाजपसोबत उभे राहणार आहेत. येथे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हर घर एक व्होट अशी भूमिका घेत कार्यकर्ते सक्रिय होणार आहेत. सुरेंद्र जैन यांनी यासंदर्भात संकेत दिले.
राम मंदिरासाठी मोदींची गरज नाही- विहिंप
By admin | Published: December 27, 2016 8:08 PM