इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्राला संपविण्यासाठी छुपे राजकारण करीत आहेत. केंद्रात सत्तेत आल्यापासून गेल्या चार महिन्यांत त्यांनी अनेक प्रकल्प गुजरातला हलविले. महाराष्ट्रविरोधी मोदींना आणि भाजपाला महाराष्ट्रातील जनता कधीही स्वीकारणार नाही, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केला.काँग्रेस उमेदवार प्रकाश आवाडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना, भाजपाचे सर्वेसर्वा असणारे नरेंद्र मोदी व अमित शहा महाराष्ट्राला संपविण्यासाठी छुपे राजकारण करीत आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला. केंद्रात सत्तेत आल्यापासून गेल्या चार महिन्यांत त्यांनी अनेक प्रकल्प गुजरातला हलविले. गुजरातच्या मुख्यमंत्री येथे येऊन मुंबईतील उद्योजकांना गुजरातमध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत. महाराष्ट्रविरोधी मोदी व भाजपाला जनता कधीही स्वीकारणार नाही; पण मोदी मात्र गल्लीबोळातून सभा घेत सुटले आहेत. भाजपाने आपल्या अहंकारापोटी २५ वर्षांच्या मित्राला-शिवसेनेला काडीमोड दिला. ‘अच्छे दिन आनेवाले’ म्हणणाऱ्या भाजपाकडे मुख्यमंत्रिपदासाठी एकही चेहरा नाही, हे दुर्दैव आहे. निवडणुका झाल्यावर मोदी काय दिल्लीतून रिमोट कंट्रोलरने राज्य चालविणार आहेत काय, असा प्रश्न त्यांनी केला. गुजरात मॉडेलपेक्षा कितीतरी पटीने महाराष्ट्र पुढे आहे. महाराष्ट्र देशातील नंबर वन राज्य झाले आहे आणि भावी काळातही राहील, असेही ते म्हणाले.माझ्या शासनामध्ये धरणात पाणी नसताना, काही तरी म्हणणारे, तसेच तासगावच्या शनिवारच्या सभेत बेजबाबदारपणाचे गैर उद्गार काढणारे मंत्री असतानासुद्धा त्यांना बरोबर घेत अनेक चांगले निर्णय घेतले गेले. शिखर बँकेला १,८०० कोटी रुपयांचा तोटा झाल्यामुळे तेथे प्रशासक नेमण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला; पण त्यामुळे आता या बँकेला ७५० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. मंत्रिमंडळाच्या १८५ बैठकांतून १,२०० शासन निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महाराष्ट्राला संपविण्यासाठी मोदी, शहांचे छुपे राजकारण
By admin | Published: October 13, 2014 5:23 AM