पुणे : देशाने अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. पण मतांसाठी स्वत:ची जात काढणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. काँग्रेसने कधीही त्यांच्या जातीवर भाष्य केलेले नाही. पण जे शहीदांच्या नावाने मते मागु शकतात ते मतांसाठी काही करू शकतात, अशी टीका कांग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार आनंद शर्मा यांनी गुरूवारी येथे केली.काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, शहराध्यक्ष रमेश बागवे, जेष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते. ‘मी मागास जातीचा असल्याने विरोधक मला विरोध करत आहेत’ असे वक्तव्य मोदी यानी अकलूज येथील सभेत केले होते. याविषयी विचारले असता शर्मा यांनी ही टीका केली. ते म्हणाले, मोदी आता हताश झाले आहेत. म्हणून जातीचा आधार घेत आहेत. यापुर्वी देशात डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, लाल बहाद्दुर शास्त्री असे अनेक पंतप्रधान होऊन गेले. पण त्यांनी राजकारण करताना कधीही जात आणली नाही. पण असे करणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत. आधी त्यांनी मते मागण्यासाठी लष्कराचा आधार घेतला. आता जातीचा आधार घेत आहेत. ते पंतप्रधानांसारखा कधीच विचार कर नाहीत, बोलत नाहीत. राष्ट्रवादाच्या मुद्यावरही त्यांनी मोदी व भाजपावर टीका केली. ‘मोदींनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. स्वातंत्रपुत्र काळात इंग्रजांविरोधात काँग्रेस लढत असताना यांनी त्यांना मदत केली. पंतप्रधान अज्ञानी आहेत. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या सर्वांना ते देशद्रोही ठरवतात. खऱ्या मुद्यांपासून ते पळत आहेत. २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडावा. पण ते गप्प आहेत. मतदारांचा विवेक आणि संयमाला ते चुकीचे समजत आहेत. यापुर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी मतदारांच्या भावनांचा अपमान केला नाही. देशात पहिल्यांदाच असले झाले आहे,’ अशी टीका शर्मा यांनी केली.-------------------
मतांसाठी जात काढणारे मोदी पहिले पंतप्रधान : आनंद शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 3:40 PM