Metro Rail Projects : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणेमेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. फेब्रुवारी २०२९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यासोबतच ठाणे येथील इंटिग्रल रिंग मेट्रो रेलच्या प्रकल्पादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पुणे आणि ठाणे आणि कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज-३ च्या दोन कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पुणे मेट्रो फेज-१ प्रकल्पाच्या सध्याच्या पीसीएमसी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या स्वारगेट ते कात्रज भूमिगत मार्गाच्या विस्तारास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली आहे.
पुणे मेट्रो फेज-१ प्रकल्पाच्या विद्यमान पीसीएमसी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या स्वारगेट ते कात्रजपर्यंत ५.४६ किमी भूमिगत मार्गाच्या विस्तारास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाची अंदाजे किंमत २९५४.५३ कोटी रुपये आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार समान प्रमाणात निधी वाटून घेणार आहे. पुण्यात कनेक्टिव्हिटी देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण केला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. या नवीन विस्तारात तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल, जे मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतील.
यासोबत ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉरलाही मंजुरी देण्यात आली आहे. या कॉरिडॉरची एकूण लांबी २९ किलोमीटर (२६ किलोमीटर उन्नत आणि ३ किलोमीटर भूमिगत) आहे आणि त्यात २२ स्थानके आहेत. हे प्रकल्प नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत इत्यादी प्रमुख भागांना जोडला जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत १२,२००.१० कोटी रुपये आहे, ज्यामध्ये खर्चाचा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात समान वाटा असले. शहरातील प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारा हा कॉरिडॉर कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गासाठी वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. हा प्रकल्प देखील २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.