पुणे : निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत प्रादेशिक सूडबुद्धीने मोदी सरकार सर्व निर्णय घेत आहे. त्यांचा खोटेपणा व ढोंगबाजी उघड होत चालली असून, लोक आता त्यांना जाब विचारू लागतील, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाच्या केंद्र व राज्यातील सरकारवर हल्ला चढविला. नोटाबंदीचा निर्णय उत्तर प्रदेश व पंजाबमधील निवडणुकांत पैशांचा सुलभपणे वापर करता यावा यासाठीच घेतला, असा आरोपही चव्हाण यांनी या वेळी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २४) होणाऱ्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा निषेध म्हणून काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने स्वारगेट चौकात शुक्रवारी सकाळी मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. ‘प्रस्ताव आमचा, प्रयत्न आमचे त्यामुळे आता भूमिपूजन व उद््घाटनही आमचेच’ असे समर्थन पक्षाच्या वतीने करण्यात आले. चव्हाण म्हणाले, ‘‘पुण्याचा प्रस्ताव कधीच मंजूर झाला होता. त्याच्याबरोबरच नागपूरचा प्रस्ताव मंजूर व्हावा असे आम्ही ठरविले होते; मात्र त्यांनी सत्तेवर येताच नागपूरच्या प्रकल्पाला गती दिली. यामागे पुणे व पश्चिम महाराष्ट्राला काही मिळू नये असा विचार होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो अमलात आणला. प्रादेशिकपणातून सूडबुद्धीने त्यांचे काम सुरू आहे. पुणेकरांनी व मुंबईकरांनाही याचा विचार करावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांचेही या वेळी भाषण झाले. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाला पक्षाचे आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, आजी-माजी नगरसेवक, पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएमपीएलच्या कार्यालयासमोर चव्हाण यांच्या हस्ते कुदळ मारून, पूजा करून भूमिपूजन झाले. पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काका धर्मावत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
मोदी सरकार म्हणजे खोटेपणा व ढोंगबाजी
By admin | Published: December 24, 2016 12:44 AM