मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 09:51 PM2023-08-27T21:51:56+5:302023-08-27T22:10:12+5:30
बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले.
मुंबई/बीड - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बीडमध्ये सभा घेतल्यापासून अजित पवार गटाकडूनही येथे सभा घेण्याची जय्यत तयारी सुरू होती. धनंजय मुंडेंच्या नेतृत्त्वात बीडमधील अजित पवार गटाच्या आमदारांनी आणि नेत्यांनी एकत्र येत बीडमध्ये जाहीर सभा घेतली. याप्रसंगी बोलताना अजित पवारांनी केवळ सत्तेत येण्याचं कारण सांगत, बीडकरांना मी कधीही अंतर पडू देणार नसल्याचे म्हटले. तसेच, कुणावरही थेट टीका करण्याचे अजित पवार यांनी टाळले. मात्र, काही जणांकडून गैरसमज पसरवला जात आहे, त्यात तसूभरही सत्य नाही, असे म्हणत शरद पवारांनी केलेल्या विधानावर अप्रत्यक्षपणे भूमिका मांडली.
बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले. तसचे, राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ उभारलं त्यातून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. आम्ही सत्तेत आलो आहोत, ते यासाठीच. सत्तेतून सर्वसामान्यांचा विकास आणि जनतेची कामं करण्याचं काम आम्ही करत आहोत. राज्यातील शेतकरी कांद्यांच्या निर्णयावरुन नाराज झाला होता. आम्हाला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले, नेत्यांचे फोन आले. मी लगेच धनंजयला दिल्लीला पाठवलं आणि पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यावेळी, कांद्याचा दर वेगळाच ठरला होता. पण, सहकारमंत्री अमित शहांशी फोनवरुन बोलणं झालं. मग, शेतकऱ्यांच्या कांद्याला २४१० रुपये क्विंटर दर जाहीर करण्यात आला. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.
बीडचं पालकमंत्रीपदा राष्ट्रवादीलाच
केंद्र आणि राज्य एकाच विचारांचं आहे. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत आमच्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. या ओळखीचा फायदा राज्यातील मागास भागातील विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी आम्ही करणार आहोत, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही राष्ट्रवादीलाच देण्याचं काम आपण करू, असे म्हणत एकप्रकारे बीड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदी धनंजय मुंडेंच असतील, असे संकेत अजित पवारांनी दिले.
केंद्रात मोदी आणि राज्यात महायुती सरकार
आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आपण भाजपा-शिवसेना महायुतीसोबत लढवणार आहोत. केंद्रात मोदींचं सरकार आणि राज्यात महायुतीचं राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणत महायुतीचं सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत वेगळा निर्णय घ्यायचा ते घेऊ, असेही ते म्हणाले.
आमचा मार्ग बहुजनांच्या प्रगतीसाठीचा
सत्तेत राहून बहुजन समाजाच्या, अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. वेगळा निर्णय घेतल्यावर पहिल्यादा टीका केली जाते. मात्र, या टीकेला कामातून उत्तर देणं ही माझी आणि आमच्या सहकाऱ्यांची भूमिका आहे. खबीर प्रशासन राबविण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात. कधी ते व्यक्तिगत असतात, कधी ते प्रशासकीय कामकाजासाठी असतात. एकदा निर्णय घेतला की तो राबवायचा असतो, त्यातून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. सकारात्मक राजकारण हा माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मार्ग आहे, बहुजनांच्या प्रगतीसाठी आम्ही तो वापरणार हा शब्दही मी तुम्हाला देतो, असे अजित पवार यांनी म्हटलं.