'मोदी सरकारने फक्त काँग्रेसची खाती नाही, तर या देशातील लोकशाही गोठवलीय', काँग्रेसची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 05:29 PM2024-03-22T17:29:05+5:302024-03-22T17:29:54+5:30

Nana Patole Criticize Narendra Modi: लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिंमत भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्यात नाही म्हणून ते रडीचा डाव खेळत आहेत. पराभवाच्या भीतीने घाबरलेले नरेंद्र मोदींनी केंद्रीय संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान सुरू केले आहे

'Modi government has not only killed the Congress, it has frozen the democracy in this country', the criticism of the Congress | 'मोदी सरकारने फक्त काँग्रेसची खाती नाही, तर या देशातील लोकशाही गोठवलीय', काँग्रेसची बोचरी टीका

'मोदी सरकारने फक्त काँग्रेसची खाती नाही, तर या देशातील लोकशाही गोठवलीय', काँग्रेसची बोचरी टीका

मुंबई - लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिंमत भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्यात नाही म्हणून ते रडीचा डाव खेळत आहेत. पराभवाच्या भीतीने घाबरलेले नरेंद्र मोदींनी केंद्रीय संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवता येऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाची खाती गोठवली आहेत. मोदी सरकारने फक्त काँग्रेसची खाती नाही तर या देशातील लोकशाही गोठवली असून वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार चीन व रशियाच्या मॉडेलनुसार काम करत असून त्यांना देशात फक्त एकच पक्ष हवा आहे त्यांच्या या मॉडेलमध्ये विरोधी पक्षाला स्थानच नाही म्हणून ते विरोधी पक्षांना संपवण्यासाठी ते आपली पूर्ण ताकद लावून संविधानिक संस्था आणि तपासयंत्रणांचा गैरवापर करत आहेत. भाजपाचा कार्यकर्ता आयकर विभागाने काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवून काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा कपटी डाव खेळला आहे. भारतीय जनता पक्षासह कोणताही राजकीय पक्ष इन्कम टॅक्स भरत नाही. असे असताना फक्त काँग्रेस पक्षावरच आयकर विभागाने कारवाई करून ११ बँक खाती का गोठवली? काँग्रेसवर जशी कारवाई केली तशी भारतीय जनता पक्षावर कारवाई करण्याची हिम्मत या इन्कम टॅक्स विभागाने का दाखवली नाही ? २०१७-१८ साली काँग्रेस पक्षाला मिळालेल्या २१०कोटी देणग्यांचा मुद्दा आहे. काँग्रेस खासदारांनी पक्षाला १४ लाख ४९ हजार रुपये रोख दिले आहेत, हे कारण दाखवून इन्कम टॅक्स विभागाने १०६% दंड लावून काँग्रेस पक्षाच्या खात्यातून ११५ कोटी रुपये जबरदस्तीने काढून घेतले आहेत.

यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे.. टायमिंग.. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाला पुढे करून काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवून आर्थिक कोंडी केली आहे. पक्षाकडे निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पैसे नाहीत. 1993-94 साली सिताराम केसरी काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते त्यावेळच्या देणग्यासाठी आता 31 वर्षानंतर इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवली आहे. राजकीय पक्ष इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नाहीत हे मोदींना माहित आहे. भाजपने कधी इन्कम टॅक्स भरला आहे का? असा सवाल करून मोदी सरकार किती खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहे हे दिसते, काँग्रेस पक्ष याप्रश्नी कोर्टात जाईल पण तोपर्यंत लोकसभा निवडणुका संपतील, अशी चिंता नाना पटोले यांनी व्यक्त केली.

एकीकडे विरोधी पक्षाची आर्थिक कोंडी करायची आणि दुसरीकडे इलोक्टोरल बाँड मधून भाजपा मात्र कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुल करत आहे. नरेंद्र मोदी या बाँडच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे खंडणीचे रॅकेट चालवत आहेत. इलोक्टोरल बाँडच्या माध्यमातून देणग्या दिलेल्या  बहुतेक कंपन्या बोगस आहेत. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाचे छापे टाकून कंपन्यांकडून जबरदस्तीने खंडणी गोळा केली आहे. लोकशाही व्यवस्थेत स्वतंत्र व निष्पक्ष वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत पण मोदी सरकार विरोधकांना संपवत आहेत. भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव होत असल्याचे चित्र देशात स्पष्ट दिसत आहे म्हणूनच मोदी-शाह टोळीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोदी सरकारच्या पापाचा घडा आता भरला आहे. हुकूमशहाचा अंत जवळ आला आहे तशी शेवटची धडपड सुरु झाली आहे पण जनता या हुकूमशाहीचा अंत करुन लोकशाही व्यवस्थेचे सरकार देशात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

Web Title: 'Modi government has not only killed the Congress, it has frozen the democracy in this country', the criticism of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.