पिंपळगाव माळवी (अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार असल्याच्या अपेक्षेने सर्व गाव व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी हॉलमध्ये जमा झाले़ मात्र, मोदींनी गावकऱ्यांशी संवाद न साधता केवळ ‘मन की बात’ ऐकविल्यामुळे ग्रामस्थांचा अपेक्षाभंग झाला़पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते पिंपळगाव माळवी ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे भाजपाच्या वतीने गावकऱ्यांना सांगण्यात आले होते़ प्रसिद्धिमाध्यमांनाही खा़ दिलीप गांधी यांनी पंतप्रधान मोदी पिंपळगाव ग्रामस्थांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याचे कळविले होते़ यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सचा सेट उभा करण्यात आला होता़ सकाळी ११ वाजता गावकरी शाळेत दाखल झाले़ पण कार्यक्रमादरम्यान मोदींनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच नाही़ आम्ही शेतीतील काम बुडवून येथे आलो़ आमचा वेळ गेला़ मात्र, मोदींशी संवाद न झाल्याने नाराजीच पदरात पडली़, असे गोरख आढाव यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली़ त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी विनंती पंतप्रधानांना करणार होतो, असे संदीप झिने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मोदींनी माळवीकरांशी संवाद साधलाच नाही
By admin | Published: May 02, 2017 4:19 AM