परभणी-
पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढ्या संस्था विकत आहेत आणि आम्हाला विचारतात की ६० वर्षांत आम्ही काय केलं? आम्ही जे ६० वर्षात केलं तेच तुम्ही विकून सरकार चालवत आहात, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परभणीच्या सोनपेठमध्ये आयोजित बालविवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद आणि कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलात होत्या.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी महागाई आणि महिलांच्या पश्नांबाबत बोलताना थेट मोदींवर टीका केली. "गरीबांना मोफत सिलेंडर देतो सांगून इतरांची सबसिडी काढून घेतली. ना गरिबांना सिलेंडर दिले, ना इतरांना. महिलांना मोदींच्या धोरणामुळे पुन्हा चुलीकडे वळावं लागलं आहे. यांचा फोटो पेट्रोल पंपावर असतो. पण यांना फक्त जाहिरात बाजी करता येते. मोदींना मला स्वर्गीय सुषमा स्वराज यांची आठवण करून द्यायची आहे. त्या जेव्हा विरोधी पक्षात होत्या तेव्हा सिलेंडर ४०० रुपये होत. आता हजारांच्यावरती सिलिंडरची किंमत गेली आहे, याचं भान आहे का त्यांना?", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"राज्यातील भाजप नेते उठसूट आमच्यावर टीका करत आहेत. त्यांना दुसरं कामच राहील नाही. त्यांनी एक लक्षात ठेवावं त्यांच्याकडे जे १०५ आमदार आहेत, ते काँग्रेस, राष्ट्रवादी मधूनच गेलेले आहेत. आता त्यांना सांभाळा. या भाजपच्या नेत्यांनी एक तरी शाळा काढली का?", असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.