माया, ममतांची मोदींना दारे बंद!
कदापि पाठिंबा नाही : मायावतींची स्पष्टोक्ती, तृणमूल काँग्रेसनेही केली दारे बंद
लखनौ : सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याची गरज भासल्यास आमच्याकडून सर्व पर्याय खुले असल्याची भूमिका भाजपाच्या वतीने मांडली जात असतानाच निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी किंवा भाजपाप्रणित रालोआला कुठल्याही प्रकारे समर्थन देणार नाही, अशी भूमिका बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती तसेच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने घेतली आहे. निवडणुकांच्या अगोदर मोदी लाटेचा प्रभाव म्हणून हवेत असलेल्या भाजपाचे पाय आता जमिनीवर आले असून त्यांना सरकार स्थापन करता येणार नसल्याची जाणीव झाली आहे असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.प्रचारात तुम्ही ममता, जयललिता व मायावती या तिघींवरही सडकून टीका करीत आहेत. त्यामुळे कदाचित तुमचे निकालानंतरचे संभाव्य मित्रपक्ष दुखावले जात आहेत, असे वाटत नाही का, असा प्रश्न भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत विचारला गेला होता. त्यावर त्यांनी, प्रचारात कोण काय म्हणाले होते, हे सरकार स्थापनेच्या वेळी फारसे महत्त्वाचे ठरत नाही, असे उत्तर दिले होते. परंतु भाजपाला पूर्ण बहुमताची खात्री असल्याने कोणाच्याही पाठिंब्याची गरज भासणार नाही, अशी पुष्टी जोडली होती.मोदी ही अशी भूमिका मांडत असताना वाराणशीत मोदींचे विश्वासू अमित शाह यांनी पाठिंबा घेण्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य शुक्रवारी केले. या पार्श्वभूमीवर, बसपा त्यांना कुठलाही पाठिंबा देणार नसल्याचे मायावती यांनी नि:संदिग्ध शब्दांत स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, निवडणुका सुरू झाल्या त्यावेळी मोदी दावे करत होते की कोणाचेही समर्थन घेण्याची आवश्यकता भासणार नाही. परंतु आता त्यांचा स्वर बदलला आहे. कुठल्याही पक्षाला जेव्हा स्वत:च्या विजयाबाबत शाश्वती नसते तेव्हाच अशाप्रकारची भाषा बोलली जाते. मोदींची मुलाखत ही अल्पसंख्यक समाजाच्या मनात संभ्रम करण्यासाठी रचलेली एक चाल आहे असा आरोपदेखील मायावती यांनी केला. मायावती म्हणाल्या, भाजपाने नेहमीच बसपाच्या मार्गात अडचणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रालोआ मागच्या वेळी सत्तेत असताना माझ्याविरुद्ध अवैध संपत्ती जमा केल्याप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लावला होती. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये आमच्याबरोबर सत्ता स्थापन केली, त्यावेळीही बसपाच्या प्रतिमा डागाळण्याचे प्र्रयत्न भाजपाकडून झाल्याचा संदर्भही त्यांनी दिला. (वृत्तसंस्था)तृणमूलचाही नकारकोलकाता : तृणमूल ने शुक्रवारी स्पष्ट केले.मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येत असेल तर, त्याचे दरवाजे आमच्यासाठी बंद आहेत व त्याच्या चाव्याही आम्ही फेकून दिल्या आहेत, असे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते डेरेक ओ ब्रायन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. मोदी नकोत तर, भाजपाप्रणित सरकारला तरी पाठिंबा देणार का, या प्रश्नालाही त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.