पुणे : नरेंद्र मोदींना भारतातील सर्वसामान्य जनतेची अजिबात काळजी राहिली नाही. मोदी अधिकाधिक काळ परदेशात असतात. केवळ निवडणूक आली की प्रचारासाठी ते फिरताना दिसतात. हे प्रधानमंत्री नसून प्रचारमंत्री आहेत, असा आरोप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला.
मोदी फक्त दोन ते तीन लोकांसाठीच देश चालवत असून भारतात जणू हुकुमशाहीच सुरु झाली आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी लाठ्या-काठ्या, गोळ्या वापरून सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला भाजप इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यांचा दुरुपयोग करून सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली असून लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कोणताही त्याग करायला तयार आहे, असेही आझाद म्हणाले.
वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाचे वाटोळे केल्याचा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. हे सरकार नोटाबंदीवर खोटे बोलले. मोदींच्या या निर्णयामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नाही उलटपक्षी महागाई प्रचंड वाढली. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व करांच्या बोझ्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहे यातून मिळणारा पैसा मोदींनी आपल्या मित्रांच्या खिशात घातला. अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचले नाही तर अधिक बुरे दिन येतील. हे सरकार संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय संपवण्याचा प्रयत्न करित असल्याचा आरोप त्यांनी केला.