नवी दिल्ली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्यात येणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी आपल्याला दिल्याचे या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नागरिकता संशोधन कायदा आणि एनपीआरचे समर्थन केले.
शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही एनआरसी, सीएए आणि एनपीआरची भूमिका काय हे समजून घेतले आहे. सीएएचे समर्थन करताना आधी हा कायदा समजून घेण्याची आवश्यकता उद्धव यांनी व्यक्त केली. या कायद्यामुळे कोणाही घाबरण्याचे कारण नाही. तर या कायद्याविरुद्ध जे भडकवत आहेत, त्यांनी हा कायदा समजून घेण्याची गरज असल्याचे उद्धव यांनी म्हटले.
एनपीआरचा संबंध लोकसंख्येशी आहे. दर दहा वर्षांनी जनगणना होतच असते. तर एनआरसी संदर्भात उद्धव यांनी सांगितले की, एनआरसीच्या माध्यमातून मुस्लिमांना देशातून बाहेर काढले जाईल अशा समज पसरवण्यात येत आहे. मात्र अस काहीही नाही. या संदर्भात काही वाद झाल्यास आपण पाहून घेऊ असं आश्वासन उद्धव यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते गृहमंत्री अमित शहा यांनाही भेटायला गेले होते.