ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - पाकिस्तानकडून आपल्यावर हल्ले केले जात असतानाही आपलं पाकिस्तानबद्दलचे मवाळ धोरण बदलले नाही. आपण आजही पाक खेळाडू, कलाकारांचे कौतुक करत असतो. पाकिस्तान मात्र आपल्याशी शत्रुत्वाच्या भावनेने वागतो. राजनाथ सिंग पाकिस्तानला बैठकीसाठी गेलेले असताना त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला, मग आपल्याला पाकचा पुळका का? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत विचारला.
लोकांनी विश्वासाने मतं दिली आहेत हे मोदींनी विसरू नये. आपण पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. आपण चहा पित राहतो, अश्रू पुसण्याच्या आधी पुढील हल्ल्याची वाट पाहतो अशा शब्दात उद्धव यांनी संताप व्यक्त केला.
आपण संतापतो, थंड होतो आणि पुन्हा पाकमध्ये जाऊन गरम चहा पितो असे उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान मोदींकडे बहुमत आहे, त्यांनी पाकविरोधात कडक कारवाई करावी असे उद्धव ठाकरे म्हणाले. युद्ध झाले तर, देशासाठी झाले पाहिजे निवडणुकीसाठी नको असे उद्धव म्हणाले.