अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची सुरू असलेली जोरदार तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिर्डी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची सुरुवात साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन करणार आहेत. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर नरेंद्र मोदी येथील निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण करणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
"मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे", असा उपरोधिक टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. यांसदर्भात जयंत पाटील यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील शिर्डी येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पण सुद्धा करण्यात येणार असल्याचे समजले. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार आहे, याचा आनंद मला होत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, "१९७० ते २०१९ पर्यंत निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी सुमारे ११०० कोटी रुपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत कालखंडात जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुमारे ९०० कोटींचा निधी देऊन मी या कालव्याचे ९० टक्के काम पूर्ण केले. या प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी मी स्वतः या कार्याची तीनदा जाऊन पाहणी केली. महाविकास आघाडी मधील तेथील लोकप्रतिनिधींनी या कामात बारकाईने लक्ष घातले. कोरोनोच्या काळात सरकारी तिजोरीवर आर्थिक भार होता, मात्र त्या परिस्थितीतही आम्ही विकास कामे थांबवली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले", असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
निळवंडे धरणाच्या कालव्याचे लोकार्पणशिर्डी संस्थानचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या काठाच्या (८५ किमी) कालव्याचे जाळे देशाला समर्पित करणार आहेत. यामुळे पाण्याचे पाइप वितरण जाळे सुकर होईल व सात तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील एक) १८२ गावांना याचा लाभ होणार आहे. यासाठी सुमारे ५१७७ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येत आहे.