मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या महत्वाकांक्षी पंतप्रधान जन आरोग्य योजनेची सुरुवात येत्या 23 सप्टेंबरपासून करणार आहेत. मात्र, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून येत आहे. मोबाईल नंबर एकाचा आणि नावे दुसऱ्यांचीच असे प्रकार झाल्याने दोन्ही कुटुंबे 5 लाखांच्या विमा संरक्षणापासून मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच मिळणार आहे. ही योजना झारखंडमधून सुरु करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे. यासाठी 30 एप्रिलपासून एक मोहीम चालविण्यात आली होती. याद्वारे या योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांची माहिती, मोबाईल नंबर आणि रेशन कार्डचा नंबर गोळा करण्यात आले.
या योजनोसाठी पात्र असल्याची माहिती mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर तपासली असता धक्कादायक वास्तव समोर आले. सिंधुदुर्गच्या एका कुटुंबप्रमुखाचा मोबाईल नंबर टाकून त्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता हिंगोलीच्या गिरगावातील एका कुटुंबाचे नाव आले. या कुटुंबामध्ये सात जण आहेत. या गोंधळामुळे सिंधुदुर्गमधल्या कुटुंबासह हिंगोलीतील कुटुंबही या योजनेच्या लाभापासून मुकण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे हा मोबाईल नंबर 2010 पासून सिंधुदुर्गमध्ये वापरात आहे. परंतू जनगणना 2011 मध्ये झालेली होती. तसेच 30 एप्रिल 2018 पासून एसईसीसीने मोहीम राबविली होती. यामध्ये ग्रामसभांमधून पात्र कुटुंबांचे मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड घेण्यात आले होते. असे असूनही गेल्या 9 वर्षांपासून मोबाईल नंबर सिंधुदुर्गमध्ये वापराला जात आहे. तसेच हिंगोली सिंधुदुर्गपासून सुमारे 600 किमी दूर आहे.
आयुष्यमान योजनेत तुमचे नाव आहे का? असे तपासा...
पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून केवळ 10 कोटी कुटुंबांनाच विमा संरक्षण मिळणार आहे. यामध्ये शहरी भागातील कुटुंबांचाही समावेश आहे. यामुळे आधीच बरीच गरजू कुटुंबे या योजनेपासून वंचित राहणार असताना ज्या कुटुंबांना योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे त्यांनाही अशा प्रकारच्या गोंधळामुळे मुकावे लागणार आहे.