जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील अंतिम टप्प्याचा निवडणूक प्रचार संपल्यानंतर भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीत आठ टप्प्यांत झालेल्या निवडणुकीतील भाजपा आणि एनडीएतील घटक पक्षांच्या स्थितीबाबत मोदींनी भागवत यांना माहिती दिली. नवीन सरकार स्थापनेच्या शक्यता आणि समीकरणांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. यावेळी संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश सोनी उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजपा आणि संघाच्या नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. गेल्या ४0 वर्षांपासून आडवाणी यांनी संघ आणि भाजपा यांच्यात दुवा साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार प्रचार संपवून दिल्लीत पोहोचलेल्या मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. निवडणूक अभियान सुरू करण्यापूर्वी मोदींनी वाजपेयी यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर ते भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी गेले. राजनाथ यांच्या समवेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात डॉ. मोहन भागवत यांच्या भेटीसाठी गेले. लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या नाराजीनंतरही मोदींना भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेण्याचा सल्ला भागवत यांनी मोदींना भेटीदरम्यान दिल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी नागपूरमध्ये सरसंघचालक भागवत यांची भेट घेऊन मोदींची कार्यशैली आणि पक्षात ज्येष्ठ नेत्यांची उपेक्षा याबाबत तक्रार केली होती. त्यापार्श्वभूमीवर भागवत यांनी मोदींना हा सल्ला दिल्याचे समजते.