मुंबईत कालचा दिवस खूप हायटेंशनचा गेला आहे. एकीकडे महायुतीची राज ठाकरे आणि मोदींची सभा आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची सभा यामुळे सहाही मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलेले होते. अशातच मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची ठाकरे गटाने तोडफोड केल्याने तणावात आणखी भर पडली आहे.
मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचे वाटप केले जात होते, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तर कोटेचा यांनी तुमचे काळे धंदे बंद करणार, असा इशारा दिला आहे. याचे पडसाद आजही उमटण्याची चिन्हे असून महायुतीची सभा संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कोटेचा यांच्या कार्यालयाकडे धाव घेत भेट दिली आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही ९ ने दिले आहे.
शुक्रवारी रात्री ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. ठाकरे गटाने कोटेचा पैशांचे वाटप करत असल्याचे आरोप करत आंदोलन सुरु केले. यात कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली त्याचे पर्यावसान जोरदार राड्यामध्ये झाले व ठाकरे गटाने कोटेच्या यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याचे वृत्त आहे. भाजपच्या वॉर रुममध्ये पैसे मोजण्याचे आणि वाटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला होता. घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेऊन सौम्य लाठीचार्ज केला. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे पथक राड्याच्या ठिकाणी दाखल झाले होते.
मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते. आमच्या लोकांनी पोलिसांना बोलावले मात्र पोलीस आले नाहीत. या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे. ते आपणही व्यवस्थित बघा. जे काम निवडणूक आयोगाचे आहे ते करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.