ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १०- लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. यासाठी मोदींनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी रणनिती आखणा-या टीमला कामाला लागण्याचे आदेश दिले असून १६ जूनरोजी ही टीम राज्यातील भाजप नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लोकसभेत मताधिक्य मिळवून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. मात्र या यशाने हुरळून न जाता मोदींनी त्यांच्या टीमला आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागण्याचे आदेश दिले आहेत. मोदींच्या प्रचार टीममधील प्रमुख शिलेदार प्रशांत किशोर यांच्या सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स (कॅग) या समाजसेवी संस्थेने महाराष्ट्राचा अभ्यासही सुरु केला आहे. सध्या कॅगचे पथक राज्यातील आत्तापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा अभ्यास करत आहे. यात मतदारांमधील ट्रेन्ड आणि मतदान करताना कोणत्या गोष्टींना मतदारांनी प्राधान्य दिला याचा आढावा घेतला जात आहे. मोदींच्या प्रचार पथकाने हीच पद्धत लोकसभा निवडणुकीच्या वेळीही वापरली होती व याचा फायदा मोदींना झाला होता.
मतदारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासोबतच ग्राऊंड लेव्हलवर काम करणारी कार्यकर्त्यांची भक्कम फौज उभी करण्यावरही या टीमने भर दिला आहे. याशिवाय सोशल नेटवर्किंग साईट्स व अन्य डिजीटल माध्यमांवरही भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात इंटरनेट युजर्सचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ट्विटर, फेसबूक आणि यूट्यूबयावर जास्त भर दिला जाईल. तसेच मोबाईल फोन्सच्या माध्यमातूनही कसा प्रचार करता येईल यासाठी विचारविनीमय सुरु असल्याचे टीम मोदीतील एका सदस्याने सांगितले.
मोदींच्या कम्युनिकेशन टीमसोबत भाजपची केद्रीय प्रचार समितीही महाराष्ट्र विधानसभेची तयारी करत आहे. भाजपचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या आयटी पथकासोबत १६ जूनरोजी बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाजपचे विश्वासू मित्र राजेश जैन हेदेखील उपस्थित राहतील असे समजते.