"राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे योग्य नाहीये", असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे संभलमधील वादावर भाष्य केले होते. सरसंघचालकांच्या भूमिकेबद्दल शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आले. या लोकांना मोहन भागवत यांनीच सत्तेवर बसवले आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
मुंबईत माध्यमांशी खासदार राऊत यांनी संवाद साधला. 'हे जे मंदिर मशीद सुरू आहे, ते थांबवलं पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले आहेत', याबद्दल संजय राऊतांना विचारण्यात आले.
'राम मंदिर आंदोलनात फक्त भाजप आणि मोदीजींचेच योगदान नव्हते'
खासदार राऊत म्हणाले, "राम मंदिर हे एक आंदोलन राहिले आहे, या देशाचे. या आंदोलनात आणि राम मंदिराच्या निर्माणात सगळ्यांचेच योगदान आहे. फक्त भाजप आणि मोदीजींचेच योगदान नव्हते. मोदी तिथे कुठेच नव्हते."
राम मंदिर आंदोलनात काँग्रेसचे लोकही होते -राऊत
"त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. भाजपचे लोकही सामील होते, नव्हते असे नाही. अडवाणीजी होते. शिवसेना होती, बजरंग दल होता. विश्व हिंदू परिषद होती. इतकंच नाही, तर काँग्रेस पक्षाचे लोकही त्यात सहभागी होते. मी बघितले आहे. जर केंद्रात नृसिंहराव यांच्यासारखा नेता केंद्रात नसता किंवा डॉ. शंकर दयाळ शर्मा नसते, तर मंदिर झालेच नसते. आज मंदिर झालेच नसते", असे म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.
रामाला मोदींनी आणले. मंदिर मोदींनी बनवले, हे खूप दुर्दैवी आहे. ही गोष्ट खरी आहे की, मंदिर बनवल्यामुळे कोणी नेता होत नाही. देश एक मंदिर आहे. देशाला बनवा. निवडणूक आली, तर मशीद खोदा, इथे खोदा, तिथे खोदा. इथे मंदिर आहे, तिथे मंदिर आहे, हे जे नाटक सुरू आहे ना, हा देशासाठी खूप मोठा धोका आहे."
"मी सरसंघचालकांच्या विधानाशी मी सहमत आहे. पूर्ण देश सहमत आहे, पण आमचं हेही म्हणणं आहे की, भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात. तर तुम्ही सुद्धा जबाबदारी घ्या", असे संजय राऊत म्हणाले.
"अयोध्येत राम मंदिर व्हावं असं हिंदुंना वाटायचं, त्याप्रमामे राम मंदिर पूर्णही झाले आहे. मात्र, राम मंदिरासारखं आंदोलन पुन्हा करून नेता होता येत नाही. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे योग्य नाहीये", असे म्हणत मोहन भागवत यांनी संभलमधील वादाच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले.