पुणो : नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची उद्या रविवारी मुंबईत होणारी सर्वसाधारण बैठक बेळगावच्याच मुद्दय़ावर गाजणार आहे. मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी यांना बेळगाव सीमाप्रश्नावरील बेजबाबदार विधानाबाबत सदस्यांकडून धारेवर धरले जाणार आहे. यासाठी सदस्यांनी जय्यत तयारी केली असून, या प्रकरणी जोशी पुरते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
बेळगाव येथे नाटय़ संमेलनाच्या व्यासपीठावर सीमाप्रश्नासंदर्भात ठराव केला जाणार नाही. बेळगावला फारसे जात नसल्याने तेथील परिस्थितीची काही माहिती नाही, असे वक्तव्य करून मोहन जोशी यांनी वादाची ठिणगी पाडली, त्यामुळे केवळ सीमावासीयांच्या नव्हेतर मराठी भाषिकांच्या भावनाही दुखावल्या गेल्या. मात्र या विधानासंदर्भातील परिणामांची जाणीव झाल्यामुळे जोशी यांनी जाहीर माफी मागून वातावरण शमविण्याचा प्रयत्न केला, पण यामुळे बेळगाव नाटय़ परिषदेने संमेलनाच्या आयोजनाबाबत असमर्थता दर्शविल्याने संमेलनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नियामक मंडळाच्या सदस्यांनी या प्रकरणाला जोशी यांना जबाबदार धरले असून, बैठकीत त्यांना जाब विचारला जाणार आहे.
स्वत: अध्यक्ष मोहन जोशी यांनी संमेलन बेळगावमध्ये घेण्यास हिरवा कंदील दिला होता. मात्र त्यांच्या विधानामुळे संमेलनाचे आयोजक अडचणीत सापडले आहेत. बैठकीत बेळगावमध्ये संमेलन घ्यायचे की नाही, यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या पाश्र्वभूमीवर नाटय़ कलावंतांनी काढलेल्या मोर्चाला जोशी यांचा पाठिंबा होता त्यामुळे तेथील परिस्थिती मला माहीत नाही या जोशी यांच्या विधानात कोणतेही तथ्य नाही, असे दिग्दर्शक योगेश सोमण
म्हणाले. (प्रतिनिधी)
वक्तव्य अत्यंत चुकीचे
बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, यासाठी संघर्ष सुरू आहे. आम्ही नेहमी मराठी भाषिकांच्याच बाजूने उभे राहिलो आहोत. त्यामुळे जोशी यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. याचा जाब त्यांना विचारला जाईल. संमेलन जर झाले नाही, तर आम्ही बेळगावात जाऊन आंदोलन करू.
- सुनील महाजन,
सदस्य, नियामक मंडळ