मुंबई : विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 28 सदस्य असल्याने या सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद त्या पक्षाकडे येऊ शकते. मात्र विधानसभेत थेट सरकारच्या बाजूने मतदान करून अथवा अनुपस्थित राहून भाजपा सरकारला पाठिंबा दिला तर परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीला पाणी सोडावे लागेल. त्यामुळे येथेही काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल. यामुळे सरकारला पाठिंबा देण्याच्या पद्धतीबाबत राष्ट्रवादी संभ्रमावस्थेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार स्थिर सरकारकरिता थेट मतदानात भाग घेतील किंवा मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहतील. यापैकी कोणती भूमिका घ्यायची त्याचा निर्णय ऐनवेळी घेतील, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्यास सुनील तटकरे यांच्याकडे हे पद जाऊ शकते. मात्र सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्यास विधानसभेत पाठिराख्या मित्रपक्षाची आणि विधान परिषदेत विरोधकाची अशा परस्परविरोधी भूमिका राष्ट्रवादीला घेता येणार नाहीत.
विधान परिषदेत राष्ट्रवादीचे 28, काँग्रेसचे 21, भाजपाचे 9, शिवसेनेचे 6, शेकाप 1, लोकभारती 1, अपक्ष 7, कवाडे गट 1 अशी सदस्यसंख्या आहे. याखेरीज 4 सदस्य भाजपाशी संलग्न असल्याने भाजपाकडे 13 मते असून, रिक्त जागांची संख्या 4 आहे. राष्ट्रवादीने सत्ताधा:यांना पाठिंबा दिल्यास काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. त्यामुळे विधान परिषदेच्या सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार अशीही चर्चा दिवसभर सुरू होती. (प्रतिनिधी)
भाजपाला शरदाचे चांदणो
राज्यातील भारतीय जनता पार्टीचे अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला. 12 तारखेला विश्वास मताच्या वेळी सरकार अस्थिर होऊ देणार नाही, अशी एकतर्फी ग्वाही त्यांनी दिली. सरकारच्या बाजूने मतदान करणार की राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार हे मात्र त्यांनी सांगितले नाही. मतदानाच्या दिवशी वास्तवाचे भान ठेवून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
आताच्या परिस्थितीत प्रशासन व राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुन्हा निवडणूक होणो परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही हे सरकार अस्थिर होऊ देणार नाही. - शरद पवार