मुंबई : नगर जिल्ह्यातील मोहटा देवस्थानने १ किलो ८९० ग्रॅम सोन्याची सुवर्ण यंत्रे बनवून ती मंदिरात पुुरली तसेच ही यंत्रे बनविण्यासाठी व त्यावरील मंत्रोच्चारासाठी २५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीने मान्य केली आहे. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी विधान परिषदेतील प्रश्नाला सरकारने उत्तर दिले आहे. ‘लोकमत’ने ‘मोहट्याची माया’ या वृत्तमालिकेतून हे प्रकरण उघडकीस आणले. मोहटादेवी देवस्थानच्या विश्वस्तांनी सुमारे दोन किलो सुवर्णयंत्रे बनवून ती मंदिराच्या बांधकामात मूर्तीखाली पुरली. त्यासाठी २४ लाख ८५ हजार इतका खर्च दाखविण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. तसेच, नगर कार्यालयाकडील निरीक्षक चौकशी प्रलंबित आहे. शिवाय धर्मादाय उपआयुक्तांनाही चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे. काय आहे प्रकरण ? मोहटादेवी हे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवस्थानने २००९ साली मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. हा जीर्णोद्वार करताना सुवर्ण यंत्रे बनवून ती मूर्तीखाली पुरण्याचा ठराव केला गेला. सुवर्ण यंत्रांमुळे ब्रह्मांडातील ऊर्जा मंदिराकडे येऊन भाविक आकर्षित होतील, असा दावा केला गेला. या यंत्रांसाठी १ किलो ८९० ग्रॅम सोने वापरले गेले. निविदा न काढता सोलापूरच्या एका पंडितामार्फत हे काम करण्यात आले. या देवस्थानवर जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्तांनी हा निर्णय घेतला. ‘लोकमत’ने ६ ते ९ जानेवारीला वृत्तमालिका प्रकाशित करून हा प्रकार उघड केला. (प्रतिनिधी)
मोहटा देवस्थानने सोने पुरल्याचे सरकारने केले मान्य
By admin | Published: April 06, 2017 5:33 AM