मुंबई- राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार (Rahit Pawar) हे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात लवकरच प्राथमिक चौकशी होईल. दरम्यान, यावरुन आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक ट्विट करुन रोहित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या या ट्विटचा रोख थेट रोहित पवार यांच्याकडेच असल्याचे दिसून येत आहे.
ईडीच्या रडारवर आलेले रोहित पवार कधीकाळी ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते. याच कंपनीची आता ईडीकडून चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. यावर बोलताना भाजप नेते मोहित कंबोज म्हणतात, ''भेटा भारताच्या जेफ बेजोसला, 2006 मध्ये या 21 वर्षीय गबरू जवानाने ग्रीन एकर रिसोर्ट अंतर्गत प्लास्टिक, हीरे, गोल्ड, बिल्डर, इक्स्पॉर्ट, इंपोर्ट, दारू ते चड्डी बनवण्याचे स्टार्टअप सुरू केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला माझी विनंती आहे की, यांचे नाव तुमच्या रेकॉर्डमध्ये टाका.''
"ईडी चौकशीसाठी आमची सहकार्याची भुमिका"- रोहित पवार
ईडी चौकशीच्या पार्श्वभुमीवर आमदार रोहित पवार यांनी सबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याची भुमिका घेतल्याचे सांगितले. नेमकं प्रकरण काय, कशाच्या आधारे बातम्या आल्या, हे माहिती नाही. मला हा विषय समजून घ्यावा लागेल, मला याबद्दल निरोप आल्यानंतर सत्यता लोकांसमोर ठेवू. आता जी कारवाई आहे, ती कोणत्या हेतूने किंवा जाणीवपूर्वक झालीय का हे पहावे लागेल. मात्र न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जी चौकशी असेल, त्याला सामोरे जाईल. त्यात काय प्रकरण आहे. हे पहावे लागेल. यापूवीर्ही वेगवेगळ्या यंत्रणांनी बोलावले आहे. त्यावेळी आम्ही सहकार्यच केले आहे. तसेच आताही सहकार्य करणार असल्याची भुमिका आमदार पवार यांनी मांडली.