- डिप्पी वांकाणी, मुंबई अतिरेकी कारवायात सहभागी होण्यासाठी मालवणीतून गायब झालेल्या चार तरुणांपैकी एक असलेल्या मोहसिन शेखला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या एटीएसचे पथक दिल्लीला जाणार आहे. गायब झालेल्यांपैकी दोन तरुण परत आलेले आहेत. त्यांनी या प्रकरणाला मोहसिन शेखला जबाबदार ठरविले आहे. इसिससाठी तरुणांची भरती करणाऱ्या रिझवान याच्या संपर्कात मोहसिन होता. तर दिल्ली पोलिसांनी मोहसिनला उत्तराखंड मॉडल प्रकरणात अटक केलेली आहे. याबाबत आपल्याला मीडियातून कळाले आहे, असे मोहसिन शेखच्या वडीलांनी सांगितले. तर या अटकेमुळे आपण समाधानी असल्याचेही ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोहसिनची कोठडी मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करु. तथापि, त्याच्या चौकशीनंतरच या प्रकरणी तिघांच्या भविष्याचा फैसला होउ शकेल. मालवणी भागातून १५ डिसेंबर २०१५ रोजी तीन तरुण गायब झाले. वाजिद शेख, नूर मोहम्मद आणि मोहसिन शेख हे ते तिघे तरुण आहेत. दरम्यान, हे तिघे इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेले असल्याचे वृत्त झळकल्यानंतर वाजिद हा पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले तर नूर मोहम्मद हा स्वत: हून परत आला. या दोघांनीही एटीएसला सांगितले की, गायब होण्याच्या या घटनाक्रमाला मोहसिन हाच जबाबदार आहे. अय्याझ सुल्तान गायब झाल्यामुळे त्याचे कुटुंबीय आम्हालाच जबाबदार ठरवित होते, असेही त्यांनी सांगितले. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोहसिन शेखच्या चौकशीसाठी एक पथक आम्ही दिल्लीला पाठवित आहोत. त्याची चौकशी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ते तरुण आणि रिझवान यांच्यातील मोहसिन शेख एक महत्वाचा दुवा आहे. रिझवानवर इसिससाठी तरुणांची भरती करण्याची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वीच महत्वपूर्ण घडामोडीत एटीएसने नवाजुद्दीन उर्फ रिझवान याला उत्तर प्रदेशातून अटक केली होती. रिझवान हा मोहसिनला मुंबईत दोन वेळा भेटला होता आणि मालवणीतून तरुणांची भरती करण्याबाबत त्याने मोहसिनला सांगितले होते. रिझवानला डोंगरी बाल सुधारगृहात पाठवावे, अशी मागणी त्याच्या वकीलांनी केली आहे. त्याच्या वयाबाबतचे कागदपत्रे आम्ही एकत्र केली आहेत. त्यात मतदान ओळखपत्राचाही समावेश आहे. ते आम्ही न्यायालयात ११ फेब्रुवारीला दाखल करू, असेही त्यांनी सांगितले.
मोहसिनला पकडले; चौकशीसाठी दिल्लीला जाणार एटीएस पथक
By admin | Published: February 07, 2016 1:15 AM