आॅनलाइन लोकमतठाणे, दि. 06 - एका पादचारी तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सिकंदर निसार शेख (२८, रा. राबोडी) आणि ठाणे स्थानक सॅटीस परिसरात अन्य एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या शशिकांत सावंत (३०, रा. डोंबिवली) या दोघांनाही ठाणेनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये पोलीस तक्रारीपूर्वी विनयभंग करणाऱ्या कथित आरोपींना यातील पिडीत तरुणींनी रणरागिणींचा अवतार घेऊन चांगलाच ‘प्रसाद’ दिला.पहिली घटना बुधवारी रात्री ८.३० वा. च्या सुमारास ठाणे सॅटीस ब्रिजच्या खाली घडली. ठाण्यातील एका कंपनीत नोकरीला असलेली २५ वर्षीय तरुणी घरी जाण्यासाठी निघाली होती. ती सॅटीस पुलाखाली उभी असतांना दादरच्या एका हेल्थ केअर मध्ये नोकरीला असलेल्या शशीकांतने विनयभंग केल्याचा तिने आरोप केला. तर आपला या तरुणीला चुकून धक्का लागल्याचा दावा त्याने केला. तो नशेत असल्याने त्याने जाणूनबुजून विनयभंग केल्याचा आरोप करून या तरुणीने त्याच्या श्रीमुखातही लगावली. त्याचवेळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. कुंभार हे अधिक तपास करीत आहेत.दुसरी घटनेत राबोडीच्या शिवाजीनगर येथील सिकंदर शेख या रिक्षाचालकाने नौपाड्यातील २५ वर्षीय तरुणीला अलोक हॉटेलच्या जवळ रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नजरेने इशारा करून विनयभंग केला. तिने याचा जाब विचारत त्याच्या श्रीमुखात लगावली. त्याने चुक कबूल करण्याऐवजी या तरुणीलाच लाथाबुक्यांनी मारहाण केली. तिनेही न डगमगता त्याचा प्रतिकार करून आरडाओरडा केल्याने नागरिकांनीही त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सहायक पोलीस निरीक्षक जयंत पाटील हे याप्रकरणी तपास करीत आहेत. या दोन्ही आरोपींना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.महिन्यात दुसरी घटनायापूर्वी तीनहातनाका येथेही एका तरुणीचा चालत्या रिक्षात जबरी चोरीच्या बहाण्याने रिक्षा चालकासह त्याच्या साथीदाराने विनयभंग केला होता. नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली होती.
ठाण्यात दोन तरुणींचा विनयभंग, रिक्षाचालकासह दोघांना अटक
By admin | Published: July 06, 2017 8:39 PM