पुणे : निपचित पडलेली आई... आक्रोशणारी ‘ती’... अवघ्या सात महिन्यांची चिमुकली... असहाय... आईच्या ओढीने तिला बिलगण्याचा अयशस्वी प्रयत्न... मात्र प्रतिसाद शून्य... पतीच्या त्रासाला कंटाळून आईने केलेल्या आत्महत्येची तिला कल्पना नसते... पाणावलेल्या डोळ्यांनी ती आई जागी होण्याची वाट पाहत असते... दोन दिवस आईच्या मृतदेहासोबत घालवल्यानंतर कोणीतरी दरवाजा उघडतो... त्यांना पाहायला मिळते हृदय चिरत जाणारे विदारक चित्र...दीपाली श्याम हांडे (वय २५, रा. विश्वसाकार बिल्डिंग, आदर्शनगर, पिंपळे निलख) ही हुशार तरुणी. एमएससी कॉम्प्युटरपर्यंत शिक्षण झालेल्या दीपालीचे संगणक अभियंता असलेल्या श्याम हांडे याच्यासोबत २ फेब्रुवारी २०१४ रोजी थाटामाटात लग्न झाले. दोघेही लातूर जिल्ह्यातलेच. ती मंगरुळची तर तो चिंचोली जोगनचा. उच्चशिक्षित असला, तरी श्याम पैशासाठी हपापलेला. बिटवाईज या नामवंत संगणक कंपनीत गलेलठ्ठ पगार घेत असूनही दीपालीचा त्याने माहेराहून पैसे आणावेत म्हणून छळ सुरू केला. पुण्यात भूखंड आणि आलिशान मोटार घेण्यासाठी त्याने पैशांचा तगादा लावला. गृहिणी असलेल्या दीपालीने पैसे आणण्यास नकार दिला होता. पतीकडून होणाऱ्या छळाची कल्पना तिने माहेरच्यांना दिली होती. अशातच त्यांना सात महिन्यांपूर्वी मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर तर त्याने आणखीनच त्रास द्यायला सुरुवात केली. तिला तो वारंवार मारहाण करू लागला. दोन दिवसांपूर्वी श्यामच्या आजीचे गावी निधन झाले. अंत्यविधीसाठी पत्नी आणि सात महिन्यांच्या मुलीला सोडून तो लातूरला निघून गेला. अंत्यविधीनंतर तेराव्याच्या कार्यक्रमाला दीपालीचे आई-वडीलही गेले होते. दीपालीबाबत त्यांनी श्यामकडे चौकशी केली. ती घरीच असून, आपल्याला फारसे काही माहिती नसल्याचे सांगितले. संशय आल्यामुळे आई-वडिलांनी दीपालीच्या मोबाइलवर फोन करायला सुरुवात केली. दिवसभर वारंवार फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेवटी श्याम आणि दीपाली राहत असलेल्या फ्लॅटच्या मालकाला फोन करण्यात आला. घरमालकाने शुक्रवारी घरी जाऊन पाहिले असता घर आतून बंद असल्याचे त्यांनी पाहिले. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, दोन दिवसांपासून घर बंद असून, घरातून लहान मुलाचा रडण्याचा आवाज येत असल्याचे त्यांना शेजाऱ्यांनी सांगितले. घरमालकाने शेजारच्यांच्या मदतीने घराचे दार उघडले. घरातील दृष्य पाहून सर्वजण जागीच थबकले. आईच्या मृतदेहाशेजारी रडत असलेली सात महिन्यांची चिमुकली त्यांना दिसली. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दीपालीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. दीपालीचा भाऊ हंसराज बिराजदार तातडीने पुण्यात दाखल झाला. शवविच्छेदन अहवालामध्ये दीपालीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
चिमुकलीने पाहिला आईचा करुण अंत
By admin | Published: June 04, 2016 12:21 AM