मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या किंमतींमुळे सामान्य जनता हैराण झाली होती. आज त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही पेट्रोल पंपचालकांमध्ये ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पैशांमध्ये वाढणाऱ्या दरांमुळे मिळालेला नफा एका दिवसात तोट्यात बदलला आहे. मात्र, दर कमी झाल्याने त्यांनाही हायसे वाटले आहे.
पेट्रोल पंपचालकांना पेट्रोलमागे 3.40 आणि डिझेलमागे प्रतिलीटर 2.20 रुपये नफा मिळतो. मात्र, पेट्रोल उत्पादन कंपन्यांकडून आदल्या दिवशीच माल खरेदी करावा लागतो. यामुळे त्या मध्यरात्री काही पैशांमध्ये दर वाढत असल्याने जादाचा नफा त्यांच्या पदरी पडत होता. असे दोन महिने सुरु होते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकाने मिळून पेट्रोलमागे 5 तर डिझेलमागे 2.5 रुपये कमी केल्याने पेट्रोल पंपावर खरेदी केलेल्या मालाची किंमत एकदम कमी झाली आहे. यामुळे दोन महिन्यांत मिळविलेला नफा एका दिवसात कमी झाला आहे.
महत्वाचे म्हणजे, पेट्रोल पंप चालकांना रोखीने कंपन्यांकडून पेट्रोल- डिझेल खरेदी करावे लागते. यामुळे त्यांनाही वाढलेल्या किंमतीनेच खरेदी करावे लागते. काही वर्षांपूर्वी हे इंधनाचे दर निम्म्यावर असताना पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी त्यांना कमी रक्कम गुंतवावी लागत होती. मात्र, आता जवळपास दुपटीहून जास्त रक्कम गुंतवावी लागत आहे. आज दर कमी झाल्याने काही प्रमाणात पेट्रोलपंप चालकांनाही दिलासा मिळाला आहे.