मुंबई : राज्यातील डान्सबारला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने आणलेले सुधारित विधेयक सोमवारी विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आले. बारबालांचे वय २१ वर्षे निश्चित करण्यात आले असून, त्यांच्यावर पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे.डान्सबार बंदीच्या सुधारित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत हे विधेयक मांडले. आता हे विधेयक विधानसभेत मांडण्यात येईल. राज्य सरकारचा डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या कायद्याच्या मसुद्याचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची स्थापन केली होती. या समितीने नव्या सुधारित विधेयकाचा आढावा घेत, कठोर तरतुदी, अटींचा समावेश केला होता. ‘महाराष्ट्र हॉटेल रेस्टॉरंट व बार रूममध्ये चालणाऱ्या अश्लील नृत्यांवर प्रतिबंध व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६’ अशा लांबलचक नावाने आलेल्या या सुधारित विधेयकानुसार, डान्सबारमधील आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नावाने भविष्यनिर्वाह निधीचे खाते उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)अशा आहेत नव्या तरतुदी- डान्सबारमध्ये नृत्य करणाऱ्यांचे किमान वय २१ वर्षे निश्चित करण्यात आले असून, बारमधील सर्व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक नोंद करून त्याची तपशीलवार माहिती ठेवणे आवश्यक ठरणार आहे. - सायंकाळी ६ ते रात्री ११.३० या वेळेतच डान्सबार चालविता येणार असून, बारबालांवर पैसे उधळण्यास मनाई करण्यात आली आहे. - नृत्यमंचावर एका वेळी केवळ ४ जणांना डान्स करता येणार आहे, तसेच कोणत्याही प्रकारे अश्लील आणि महिलांच्या प्रतिष्ठेला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची बार मालकांना खात्री करावी लागणार आहे.- सार्वजनिक क्षेत्र या व्याख्यांतर्गत येणाऱ्या बारमधील जागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले असून, ३० दिवसांचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक असणार आहे. अशा विविध अटी आणि शर्ती सुधारित विधेयकात आहेत.- डान्स बारमधील महिला व इतर कर्मचाऱ्यांच्या नावाने पीएफ सुरू करणे अनिवार्य.- आवश्यकतेनुसार पाळणाघराची सुविधा देण्यात यावी.- परिमट रूम व नृत्य कक्षात विभाजक भिंत असावी. सर्व बाजूंनी तीन फूट उंचीचा कठडा घालून मंच तयार करावा.- विनापरवाना डान्सबार सुरु केल्यास ५ वर्षापर्यंतची कैद आणि २५ लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.- डान्सबारमध्ये अश्लील नृत्य अथवा अनैतिक कृत्यांसाठी ३ वर्षांपर्यंतची कैद व १० लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. - डान्सबारमध्ये पैसे उधळणे, बारबालेशी लगट करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून या नियमाचे उल्लंघन केल्यास सहा महिन्यापर्यंतची कैद व ५० हजारापर्यंतच्या दंडाची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.
बारबालांवर पैसे उधळण्यास मनाई; सीसीटीव्ही अनिवार्य
By admin | Published: April 12, 2016 2:55 AM