मुंबई : मनी लाँड्रिंग व १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सहायक व सचिव यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी २० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व खासगी सहायक कुंदन शिंदे यांना विशेष न्या. एस. एम. भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपास यंत्रणेने या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे न्यायालयाने त्यांना २० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांवर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्या (पीएमएलए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल देशमुख प्रकरणात शिंदे व पालांडे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडीने गेल्या सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते. सीबीआयने देशमुख यांच्यावर आयपीसीअंतर्गत फौजदारी स्वरूपाचा कट रचणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविलेला आहे.
अनिल देशमुखांच्या दोन सहायकांना 20 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी, मनी लाँड्रिंग प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 12:11 PM